आडकाठी मोडीत काढल्याने नगरकरांकडून कौतुक | डीवायएसपी अमोल भारतींची खमकी भूमिका | डांगे साहेब, बड्यांचीही अतिक्रमणे पाडणार का?
सारीपाट / शिवाजी शिर्के:-
नगर शहरातील अतिक्रमणे आणि त्यांना कायम मिळालेला राजाश्रय हे समिकरण मोडीत निघू पाहत आहे. अतिक्रमण करत रत्यावर रहदारीला अडथळा निर्माण करायचा आणि उलटपक्षी पादचाऱ्यांसह वाहन धारकांना मारहाण करण्यापर्यंत मजल गाठण्याचे प्रकार नवीन नाहीत. मात्र, शहरातील वाढत्या अतिक्रमणांचा मुद्दा आणि त्यातून होणारे वादविवाद याची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आणि पोलिस प्रशासनास जाब विचारला. ‘आवरा’ असा सज्जड दम आ. जगताप यांनी भरताच यंत्रणा कामाला लागली आणि बेधडक मोहीम राबविली गेली. या मोहिमेबद्दल महापालिका प्रशासन प्रमुख असणारे आयुक्त यशवंत डांगे आणि शहराचे डीवायएसपी अमोल भारती यांचे अभिनंदन! अतिक्रमण धारकांनी आडकाठी आणत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला असताना त्यांच्यासह त्या जमावावर थेट लाठीहल्ला झाला. बरे झाले, दांडक्याने ठोकून काढले! अतिक्रमण करुन राहीलेल्या या मंडळींना दंडुक्याचीच भाषा समजते आणि ते काम अमोल भारती व त्यांच्या टीमने केले. बड्या धेंडांच्या विरोधात अशीच तीव्र मोहीम आयुक्त यशवंत डांगे हे हाती घेतील असा आशावाद बाळगण्यास हरकत नाही.
माळीवाडा बसस्थानक परिसरातील अवैध अड्ड्यांची हप्तेगिरी?
नगर शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसर म्हणजे हातगाडीवाल्यांना मुक्त हस्ते मिळालेले रान! रिक्षा चालकांची दादागिरी तर वेगळीच! याशिवाय परिसराला टपऱ्यांचा पडलेला विळखा वेगळाच! जिल्हा परिषदेच्या समोरील रस्त्यासह इंपीरीअल चौकापासून ते मार्केटयार्ड चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा हातगाडी वाल्यांसह टपऱ्या! यातील सत्तर टक्के व्यवसायीक हे वैध धंदे करणारे! पोलिसांसमक्ष हे सारे चालत असताना त्यातून मिळणारी हप्तेगिरी नक्की कोणाच्या वाट्याला जातेय हे तपासण्याचे काम करणार कोण? ज्यांनी तपास करायचा तेच यातील वाटेकरी असल्याची जाहीर चर्चा आहे.
कोठला चौक अन् तिथली दादागिरी मोडीत काढा!
कोठला चौकात टपरी चालकांपासून ते काही हातगाडीवाले आणि काही व्यवसायीक हे पूर्णत: रस्त्यावर ठाण मांडून असतात. वाहन चालक आणि पादचाऱ्यांना याचा त्रास नित्याचाच! कोणी जाब विचारण्याचा प्रयत्न केलाच तर लागलीच त्याला फटके! दादागिरी आणि गुंडगिरी तर नित्याचीच. कोठला येथे टपऱ्या, पत्र्याचे शेड, ओटे बांधून वाहतुकीस अडथळा निर्माण झालाय. या मार्गावरील टपऱ्यांसह सर्व अतिक्रमणे काढण्यात आली आणि येथील अडथळे काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला असला तरी त्यातील सातत्याची गरज आहे.
भारती साहेब, रोजच वाहतूक कोंडीत अडकावेत!
शहर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती काही दिवसांपूव तारकपूर बसस्थानकासमोर झालेल्या वाहतूक कोंडीत अडकले होते. बराचवेळ झाला तरी वाहने पुढे सरकत नव्हती. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या पोलिसांनी सत्यावर उतरून रस्ता खुला केला. कालच्या अतिक्रमण हटाव मोहीमेत अमोल भारती हे कमालीचे आक्रमक झालेले पाहून नगरकरांना बरे वाटले. एक खमका अधिकारी नगरमध्ये कायद्याचं राज्य आणतोय हे पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले. शहरातील वाहतूक कोंडीत अमोल भारती हे रोजच अडकावेत अशी उपरोधीक अपेक्षा नगरकरांनी व्यक्त केली आणि त्यातून शहरातील वाहतुकीची समस्य सुटेल असा आशावाद देखील व्यक्त केला.
आयुक्त साहेब, जेसीबी नव्हे बुलडोझर चालवा!
महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग व पोलिस प्रशासनाने पुणे महामार्गावरील सक्कर चौक येथून रस्त्यावरील लहान- मोठी अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. पोलिस बंदोबस्तात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या फुटपाथवरील खाद्यपदार्थाच्या टपऱ्या, हातगाडे, पत्र्याचे शेड, ट्रॅव्हल्सचे थांबे, पक्के बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. ही कारवाई सायंकाळपर्यंत सुरू होती. पथक सायंकाळी कोठला परिसरात दाखल झाले. तेथील टपऱ्यांवर जेसीबी चालविण्यात आला. त्यावेळी काही नागरिकांनी कारवाईस विरोध केला. मात्र, प्रशासनाने हा विरोध मोडीत काढला. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत जमाव पांगविला. यामुळे परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. खरेतर अतिक्रमण मोहीमत जेसीबी ऐवजी बुलडोझर चालवून महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी खमकी भूमिका घेण्याची आता गरज निर्माण झाली आहे.
वाहन चालकांच्या जोडीने वाहतूक शाखेला शिस्त लागेल का?
शहरातील रस्त्यांच्या बाजूला असणारी अतिक्रमणे हटवली गेली असताना आता रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असला तरी वाहतूक नियमनाच्या अनुषंगाने वाहतूक शाखा तत्पर होण्याची गरज आहे. नगर शहरातील बसस्थानक, र्मोकट यार्ड चौक, कायनेटीक चौक, एसपी चौक ते पत्रकार चौक, प्रेमदान चौक, सावेडीनाका, बोल्हेगाव फाटा येथे वारंवार वाहतूक कोंडी होते. वाहतूक नियंत्रीत करणारे कर्मचारी येथे अभावानेच दिसतात. याकडेही आता लक्ष द्यावे लागणार आहे.