पुणे / नगर सह्याद्री
Weather News : जून महिन्याची सुरुवात झाल्या क्षणापासून पावसाचं आगमन कधी होणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उकाडा कमी होण्याचं नाव घेत नसल्यामुळे आता सूर्याचा प्रकोप असह्य होताना दिसत आहे. पुढील 24 तासांच्या हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर आजपासून पूर्वमोसमी पाऊस सुरु होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यात सध्या मान्सूनचं आगमन झालं नसलं तरीही मान्यूनच्या आगमनासाठीचं पोषक वातावरण मात्र तयार होताना दिसत आहे. ज्यामुळं कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या पूर्व भागात सोमवारी (3 जून 2024) रोजी वादळी पावसाची हजेरी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांमध्ये पावसाचा यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 4 जून पर्यंत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. हवामान विभागाकडून पुढील 2 दिवस सिंधुदुर्गात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सध्याच्या घडीला अरबी समुद्रात मान्सूनची वाटचाल वेगानं सुरु झाली असून, महाराष्ट्रात मान्सून वेळेआढीच दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्याच्या दक्षिणेकडे सापेक्ष आर्द्रता वाढत असल्यामुळं पश्चिमेला असणारा वाऱ्याचा झोत आणखी ताकदीनं वाहताना दिसत आहे. दरम्यान केरळात दक्षिण पश्चिमी मोसमी वाऱ्यांमुळं विविध भागांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. केरळच्या पतानमथिट्टा, अलप्पुझा, इडुकी आणि वायनाड जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
अरबी समुद्राच्या पश्चिमेवरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आतापर्यंत आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि बंगालच्या उपसागरामध्ये बहुतांश भाग व्यापला असून, ज्याप्रमाणं हा मान्सून केरळात निर्धारित वेळेआधी पोहोचला त्याचप्रमाणं तो महाराष्ट्रातही ठरलेल्या वेळेआधी पोहोचणार असल्याची शक्यता आहे. येत्या 48 तासांमध्ये हे मोसमी वारे अरबी समुद्रासह कर्नाटकता आणखी काही भाग व्यापतील आणि इथून पुढं कूच करतील. त्यामुळं महाराष्ट्रात मान्सूनपूर्वल सरींमुळं या पावसाच्या आगमनाची पूर्ण वातावरणनिर्मिती होताना दिसणार आहे.