अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
कौडगाव (ता. नगर) येथे एका शेतजमिनीवरील ‘ताबामारी’च्या प्रकरणावरून झालेल्या वादातून जातीवाचक शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमकीचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरूध्द अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रम भाऊसाहेब पाटोळे (वय 38, रा. कौडगाव, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. राम परसराम खर्से, परसराम तुकाराम खर्से, गोकुळ आदिनाथ खर्से (तिघे कौडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संशयित आरोपींनी फिर्यादीच्या शेतजमिनीवर अतिक्रमण केले. तसेच, येण्या-जाण्याच्या रस्त्यावर अडथळा निर्माण करून त्यांना त्रास दिला.
12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून ते 13 फेब्रुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत फिर्यादी यांच्या घरासमोर हा वाद सुरू होता. यावेळी संशयित आरोपींनी शेतातील लाईटच्या केबल तोडून नुकसान केले. तसेच, फिर्यादी आणि त्यांच्या आईला धक्काबुक्की करून जातिवाचक शिवीगाळ केली. ‘जर तुम्ही आमच्या शेजारी राहिलात, तर तुम्हा सर्व कुटुंबाला जेसीबीखाली घालून संपवून टाकू’ अशी धमकी दिली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले करत आहेत.