मुंबई । नगर सहयाद्री:-
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांना एकीचे, समन्वयाचे आणि निवडणुकीच्या तयारीचे स्पष्ट संदेश दिले. आम्ही दोघे भाऊ वीस वर्षांनी एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही एकमेकांमध्ये वाद का घालता? असा स्पष्ट सवाल त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी सांगितले की, निवडणुकीच्या तयारीत कोणत्याही प्रकारचे अंतर्गत वाद नकोत. जुने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पक्षापासून दूर गेलेले कार्यकर्ते यांना पुन्हा जोडावे आणि एकजुटीने कामाला लागावे. त्यांनी मतदार यादी तपासण्याचेही निर्देश दिले. मतदार यादीवर विशेष लक्ष द्या. निवडणुकीसाठी योग्य ती प्रत्येक तयारी व्हावी,असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना बजावले. राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत मनसेची सत्ता येईल, असा विश्वासही व्यक्त केला.
हे मी टाळ्या शिकवण्यासाठी म्हणत नाही. आपण सर्वांनी जबाबदारीने काम केल्यास सत्ता निश्चित आहे, असे ते म्हणाले. मराठी भाषेच्या मुद्द्यावरही त्यांनी भूमिका स्पष्ट करत सांगितले, विनाकारण कोणालाही त्रास देऊ नका. समजावून सांगा. समजले नाही आणि उर्मटपणे वागले, तर योग्य ती भूमिका घ्या. पण या घटनांचे व्हिडिओ काढू नका, अशी सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. या मेळाव्यामुळे आगामी निवडणुकीसाठी मनसेचा दृष्टिकोन आणि कार्यपद्धती स्पष्ट झाली असून, पक्षातील गटबाजी थांबवून संघटित शक्तीने निवडणूक लढवण्याचा निर्धार यामधून दिसून येत आहे.