अहमदनगर। नगर सह्याद्री
एका तोतया महिला पोलीस अधिकाऱ्याने नगरच्या एका सराफ व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सराफ व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून एक मोबाईल नंबर धारक व अमिनुद्दीन खान (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही, दोघे रा. उज्जैन महाकाल, मध्य प्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीयांना शनिवारी (दि. २) रोजी सायंकाळी सात वाजता एक अनोळखी नंबरवरून फोन आला. टू-कॉलरवर रजणी सिंह असे नाव आले व एका महिलेच्या अंगावर पोलीस खात्याचे कपडे असल्याचा फोटो दिसला.
फोन घेतला असता, ‘उज्जैन महाकाल येथून पोलीस ऑफीसर बोलत आहे, तुमच्या दुकानाचे बिल आरोपीकडे सापडले आहे. आरोपीने तुमच्या दुकानात चोरीचे सोन्याचे दागिने देऊन त्या बदल्यात दुसरा सोन्याचा दागिना केला व त्याची पाच ग्रॅमची रिकव्हरी निघत आहे’, अशी बतावणी केली.
मी तुमच्यावर गुन्हा दाखल करीन, अटक करील अशी धमकी दिली. त्यानंतरव्हॉट्सअॅपला क्युआर कोड पाठविला व त्यावर ३२ हजार ४०० रुपये टाकण्यास सांगितले. फिर्यादी यांनी पैसे पाठविले असता त्या महिलेने उडवाउडवीची उत्तरे दिली.