पिंपळगाव जोग्याचं पाणी पुणेकर चोरतात | पारनेकरांसाठी सोडलेल्या आवर्तनातून दिवसरात्र उपसा होतो जुन्नर तालुक्यात! विजय औटी- नीलेश लंकेसह सार्यांचीच चुप्पी!
कुकडी नदीवरील ६५ अनधिकृत बंधार्यांचे काय? विखे पाटलांसह नंदकुमार झावरेंसारखी आक्रमक भूमिका कोण घेणार? झारीतील खरे शुक्राचार्य थोरले पवारच!
मोरया रे / शिवाजी शिर्के –
जिल्हा बँकेच्या मुद्यावर थोरात-विखेंची चुप्पी कशी काय या बाप्पाने विचारलेल्या प्रश्नावर मी निरुत्तर होतो. काहीतरी अंडरस्टँडींग नक्कीच असणार अशी शंकेची पाल मनात चुकचुकली! बाप्पाला याबाबत विचारयचं असं ठरवून मी कार्यालयात आलो. समोर पुढ्यात बाप्पा बसलेला. त्याच्या समोर जिल्ह्याचा नकाशा! डोळ्यावरचा चष्मा नाकापर्यंत आलेला! हातात पेन्सील! पेन्सीलच्या आधारे बाप्पा काहीतरी मार्कींग करत असल्याचे मी ताडले!
मी- बाप्पा, नकाशात काय शोधतोस?
श्रीगणेशा- पवार साहेब येताहेत ना? त्यांचा दोन दिवसांचा मुक्काम आहे तुझ्या जिल्ह्यात! या दोन दिवसात ते कोणाकोणाची विकेट उडवू शकतात आणि कोणाकोणाला काय- काय प्रसाद देऊ शकतात याचा अंदाज घेत आहे. त्याच्याच जोडीने माहिती घेत आहे ती साकळाई योजनेची! या योजनेत नगरमधील कोणकोण झारीतील शुक्राचार्य आहेत याची!
मी- बाप्पा, नगर तालुक्यासाठी ही योजना आवश्यकच आहे रे! योजना झाली पाहिजे यासाठी सारेच प्रयत्न करताहेत! गेल्या चाळीस यासाठी अनेकदा आंदोलनेही झाली.
श्रीगणेशा- होय ना! आंदोलने झाली! थेट मंत्रालयावर पायी मोर्चा झाला. सारं काही झालं! पण, प्रत्यक्षात काय झालं रे? पुणेकरांच्या दावणीला नगरचे पुढारी बांधलेत असा जुना आरोप होतोय! राज्याचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणारा नगर जिल्ह्यातील कोणताच नेता पुणेकरांच्या पाणी चोरीबाबत बोलायला तयार नाही. बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील याला अपवाद आहेत. त्याहीपेक्षा हा विषय थेट विधानसभेत पोटतिडकीने मांडणार्या नंदकुमार झावरे यांच्या आक्रमक भूमिकेची आज सार्यांनाच आठवण येत असेल. नगर तालुक्याची साकळाईची योजना आणि पाणी ही मागणी आता अलिकडे जोर धरु लागली. मात्र, त्याआधी नंदकुमार झावरे यांनी पुणे जिल्ह्यातील पवारांच्या बगलबच्चांनी पारनेर- नगरचे हक्काचे पाणी चोरले असा जाहीर आरोप करून खळबळ उडवून दिली होती. कुकडी नदीवर अनधिकृतपणे तब्बल ६५ बंधारे बांधले आणि हे वाहून जाणारे नगरकरांच्या हक्काचे पाणी अडवले! हे बंधारे आधी पाडून टाकण्याची मागणी याच नंदकुमार झावरे यांनी केली होती. त्यावेळी नगर जिल्ह्यातील तमाम पुढारी मंडळी त्याच बारामती- पुणेकरांचे चोचले पुरविण्यात धन्यता मानत राहिली. मुळात कुकडी नदीवर ६५ बंधार्यांची साखळी उभी राहत असताना नगर जिल्ह्यातील पुढारी चोकोबार चोखत होते काय? त्यांना हे चोकोबार कोणी दिले हे आता तपासण्याची वेळ देखील निघून गेलीय! आज हेच अनधिकृत असलेले ६५ बंधारे आधी भरुन घेतले जातात आणि त्या मुद्यावर पुणेकर पुढारी मंडळी त्यांच्यातील राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येतात. नगरकर त्यांचा आदर्श घेणार आहेत की नाही! निवडणूक आली कुकडीचं पाणी, साकळाई योजना अन् पिंपळगाव जोगा धरणाचं पाणी आठवणारी ही मंडळी आणि त्यांची नौटंकी निवडणुकीपुरतीच वाटू लागलीय! कोणाच्या तरी बदनामीची सुपारी घ्यायची आणि तोच पुढारी यातील खर अडथळा आणणारा झारीतील शुक्राचार्य आहे असं म्हणत बोंब ठोकायची! मात्र, वास्तव सत्य काय हे यातील बहुतांश मंडळींना माहिती आहे. ज्यांच्या दारात किंवा कोर्टात नेऊन हा विषय सुटेल असे वाटते, त्या शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्या समर्थकांनी आधी या पुढार्यांकडून लेखी घेण्याही हिंमत दाखवावी! कृती समितीच्या शिष्टमंडळाला परवा शरद पवार यांनी शब्द दिला की, महाविकास आघाडीचं सरकार आले की दोन-तीन महिन्यात हा विषय मार्गी लावू!
मी- बाप्पा, पवार साहेबच यातून मार्ग काढू शकतील बरं! शब्दाला पक्के आहेत ते!
श्रीगणेशा- शब्दाला पक्के…! इतके वर्ष काय करत होते मग ते! कुकडी नदीवर अनधिकृत पणे ६५ बंधारे उभे राहत असताना हे पाणी नगरकरांचे आहे आणि ते त्यांना मिळाले पाहिजे अशी भूमिका शरद पवार यांना त्यावेळी का घ्यावीशी वाटली नाही? बरं त्यावेळी नसेल घेतली त्यांनी! पण, मग आता तरी त्यांनी ही भूमिका जाहीरपणे घ्यावी. श्रीगोंदा- नगरमध्ये ते येत आहेतच परवा! त्यावेळी तरी त्यांनी साकळाईतील मोठा अडसर दूर होईल आणि पुणे जिल्ह्यातील कुकडी नदीवरील अनधिकृत ६५ बंधारे पाडून टाकू अशी जाहीर भूमिका घ्यावी! घेतील का रे ते अशी भूमिका? नाही घेणार ते? कारण, तुमच्या ३५ गावांपेक्षा त्यांना महत्वाची आहेत ती पुणे जिल्ह्यातील त्यांची तीन-चार तालुक्यातील गावे! त्या गावातील जनता! अरे यार तुम्ही भेकड आहात! पुणेकरांच्या या पाणी चोरीच्या विरोधात विखे पाटील- नंदकुमार झावरे हे बोलत असताना तुम्हाला त्यावेळी त्यांच्यातील पवार द्वेष दिसला! वास्तव त्यावेळी तुम्ही समजूनच घेतले नाही. आता बोलण्यात काहीच अर्थ नाही! धोका काय आहे आणि काय होणार आहे विखे पाटील- नंदकुमार झावरे यांनी त्यावेळीच घसा तुटेस्तोवर ओरडू- ओरडू सांगितले होते. त्यावेळी तुम्हाला त्यांच्यात पवार द्वेष दिसला! आता काय? श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते हे आता तुम्हाला यातील अडथळा वाटू लागलेत! पाचपुतेंनी काय भूमिका घेतलीय याहीपेक्षा तुमची मागणीच चुकली हे समजून घेण्याची गरज आहे. कुकडीतील पाण्याचा हेड वाढला असताना त्या कुकडी लाभक्षेत्रातील धरणांचं ओव्हरप्लोचं पाणी आम्हाला द्या अशी चुकीची आणि दिशाभूल करणारी मागणी करणंच मुळात हास्यास्पद आहे. ओव्हरप्लोचं पाणी मिळण्याची मागणी मान्य झाली तर तुम्हाला ज्यावेळी गरज आहे अशा मार्च, एप्रिल, मे, जून या चार महिन्यात पाणीच मिळणार नाही. पावसाळ्यात ही धरणं भरणार आणि ती ओव्हरफ्लो होणार, त्यानंतर तुमच्या मागणीनुसार पाणी मिळणार! मग, याच पावसाळ्यात साकळाईच्या परिसरातील ३५ गावांमध्ये पाऊस पडलेला असणार! त्यावेळी होणार्या पावसात या गावांमधील पाझरतलाव थोड्याफार फरकाने भरणारच! मग, हे ओव्हरफ्लोचं पाणी घ्यायचं कशासाठी? घोड धरण बांधताना ते दहा टीएमसी क्षमतेचं होतं. मात्र, प्रत्यक्षात ते साडेसात टीएमसी क्षमतेचं झालं. याचाच अर्थ या धरणाचं अडीच-तीन टीएमसी पाणी वाहून जात आहे. हे शिल्लक वाहून जाणारं पाणी देण्याची मागणी करताना त्यात ओव्हरप्लोचं पाणी द्या ही मागणी करण्यापेक्षा आम्हाला आमचं पाणी द्या अशी मागणी का होत नाही? ओव्हरफ्लोचे पाणी घेतले तर नंतर कोणतेच पाणी मिळणार नाही. पावसाळा संपला म्हणजेच ओव्हरप्लो पाणी संपले! यानंतर या योजनेचे काय? गरज पडते ती डिसेंबर- जानेवारीत! त्यावेळी ओव्हरफ्लोचे पाणी मिळणार कसे? डिंभे माणिकडोह बोगदा झाला तर त्याचा फायदा होईल. या बोगद्याला वळसेंचा विरोध. या बोगद्याला मध्यंतरी पाचपुते यांनी प्रयत्नपूर्वक तत्वत: मंजूरी घेतली होती. मधल्या काळात मविआ सरकार आले. त्यांनी आडकाठी आणली. यात साकळाई दिसत नाही. मात्र, पाणी उपलब्ध नसेल तर साकळाई होणार कशी? पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मागीतलं जात असेल तर त्यात आडकाठी आणि दादागिरी पुणेकरांची आहे हे समजून घेण्याची गरज आहे. चोरी ज्यांनी केलीय, त्यांच्याकडेच त्याचा तपास द्यायचा असाच काहीसा प्रकार सध्या चालू आहे. त्यामुळे या योजनेतील वास्तव समजून घेण्याची गरज आहे. नगर तालुक्यातील जनतेसाठी ही योजना निव्वळ मृगजळ ठरु नये! पिंपळगाव जोग्याचं पाणी नंदकुमार झावरे- वसंतराव झावरे यांनी प्रयत्नपूर्वक पारनेरसाठी आणले! कालवे झाले! कालव्यातून पारनेरकरांसाठी पाणी सुटते! प्रत्यक्षात त्यातील किती पाणी येते? चार- दहा टँकर भरतील इतके पाणी येते. शिवडोह टेलटँकपर्यंत पाणी येण्याआधी हा कालवा जुन्नर तालुक्यातील ज्या -ज्या गावांमधून येतो, त्या गावांमध्ये कॅनोलवर दोन्ही बाजूने विद्युतपंप आणि पाईपचे जाळे टाकून या पाण्याचा उपसा केला जातो. पाणी पारनेरकरांसाठी सोडलेले असताना जुन्नरकर त्याची चोरी करतात. या चोरीसाठी त्यांचे आमदार- खासदार त्या कालव्यावर तळ ठोकून बसतात आणि पारनेरचे लोकप्रतिनिधी हे सारं उघड्या डोळ्यानं पाहत बसतात! कोणीच त्याला अपवाद नाहीत! पुणेकरांच्या दावणीला बांधलेले आहेत सारेच! दोन पवारांचे दोन गट आहेत आज! पण, त्यातील एकही गट यास विरोध करायला तयार नाही आणि त्यांची ती हिम्मत देखील नाही! सारेच गमजेखोर आहेत रे! या सार्याचा हेटमास्तर कोण आहे हे समजून घेण्याची गरज आहे. ओव्हरप्लोचे पाणी मागा, अशी मागणी करा ही सुचनाच थोरल्या पवारांची! समजली की नाही गंमत! नसेल समजली तर पुढच्या भेटीत ही गंमत मी तुला नक्की सांगतो. चल, निघतो ती! (दुसर्या क्षणाला बाप्पा मार्गस्थ झाला आणि मी देखील!)