अर्ज भरण्यास २५ एप्रिल पर्यंत मुदत | १३ मेला मतदान
अहमदनगर । नगर सहयाद्री-
लोकसभेच्या अहमदनगर व शिर्डी मतदारसंघांसाठी १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असून २५ एप्रिल अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. तर अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रीया दोन दिवसांवर आल्याने निवडणूक यंत्रणाही सज्ज झाली आहे.
१८ व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यांतील मतदारसंघांची निवडणूक १३ मे रोजी होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील अहमदनगर व शिर्डी या दोन मतदारसंघांचा समावेश आहे. या दोन्ही मतदारसंघांची निवडणूक अधिसूचना १८ एप्रिल रोजी प्रसिध्द होणार आहे. याच दिवसांपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवारी अर्ज देखील याच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. अहमदनगर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील दुसर्या मजल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दाराम सालीमठ स्वीकारणार आहेते.
उपलब्ध अर्ज तपासणीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली दहा ते बारा अधिकारी कर्मचार्यांची टीम नियुक्त केली आहे.शिर्डी मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज राहाता येथील राहाता तालुका प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर स्वीकारणार आहेत. याठिकाणी उपलब्ध होणार्या अर्जाची तपासणीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांच्या नेतृत्वाखाली दहा ते बारा अधिकारी-कर्मचार्यांची टीम नियुक्त केली आहे.
महाविकास आघाडीचे नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नीलेश लंके यांच्या संवाद यात्रेचा समारोप शुक्रवारी (दि.१९) नगरमध्ये होत आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: नगरमध्ये दिवसभर तळ ठोकून राहणार आहेत. गांधी मैदानात सायंकाळी जाहीर सभा होणार असून या सभेच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. दरम्यान, माहितगार सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नीलेश लंके हे मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
२५ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज सकाळी ११ ते ३ वाजेपर्यत स्वीकारले जाणार आहेत. अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्जाबरोबरच उमेदवारांना २५ हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवारांना मात्र १२ हजार ५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.शिर्डी मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे या मतदारसंघातून उमेदवारांना उमेदवारी अर्जाबरोबरच १२ हजार ५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
विखे, लंकेंच्या शक्तीप्रदर्शनाकडे लक्ष
अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून खासदार सुजय विखे पाटील तर महाविकास आघाडीकडून आमदार नीलेश लंके उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्या आधीच विखे, लंके यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. तसेच आरोप प्रत्यारोपांच्या हायहोल्टेज फैरीही झडू लागल्या आहेत. गावोगावी सभा घेऊन आश्वासनांचा पाऊस पडला जात आहे. विखे-लंके यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी दोन्ही उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.