मुंबई। नगर सहयाद्री-
एकीकडे लोकसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार असून जनतेच्या नजर निवडणुकीच्या निकालाकडे लागल्या आहे तर दुसरीकडे बळीराजा पावसाच्या हजेरीची आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच राज्यात तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, जारी केलेल्या अंदाजानुसार, आज मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील. पुण्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तव्यात आली आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात आजपासून पुढील तीन ते चार दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं असून येत्या २४ तासांत मान्सून कोकणात आणि त्यानंतर पुण्यात दाखल होऊ शकतो.