श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या सद्गुरु संत श्री शेख महंमद महाराज यांच्या समाधी मंदिराच्या जीर्णोद्धारात वक्फ बोर्डाच्या अडथळ्यांमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिर निर्माण कृती समितीच्या वतीने गुरुवारी २४ जुलै पासून समाधीस्थळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे प्रमुख घनश्याम शेलार यांनी दिली.
संत शेख महंमद महाराज हे वारकरी संप्रदायातील संत असून त्यांनी सपत्नीक संजीवन समाधी घेतली आहे. अशा प्रकारची समाधी घेणारे ते एकमेव संत मानले जातात. त्यांच्या समाधीस्थळी मंदिर उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, सन १९५३ मध्ये ‘श्री शेख महंमद बुवा देवस्थान’ हे धर्मदाय आयुक्तांकडे नोंद असलेले देवस्थान बेकायदेशीरपणे वक्फ बोर्डाकडे वर्ग करण्यात आले.
वक्फ कायद्यानुसार दर्गा किंवा मशिदीची नोंद शक्य आहे, मंदिराची नाही. त्यामुळे जीर्णोद्धारास कायदेशीर अडथळे निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, यापूर्वी १७ एप्रिल रोजी बंडातात्या महाराज कराडकर, माणिक महाराज मोरे आणि जब्बार महाराज शेख यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील व्यापाऱ्यांनी दोन दिवस दुकाने बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
त्यानंतर २८ एप्रिलपर्यंत धरणे आंदोलन आणि अन्नत्याग आंदोलनही झाले. प्रशासनाने तोडगा काढण्यासाठी वेळ मागितल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. मात्र, तीन महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आता प्रत्येक गुरुवारी उपोषण करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात २४ जुलै पासून होणार असून,भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.