अहमदनगर । नगर सहयाद्री-
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी उद्या (बुधवारी) मतदान होणार आहे. त्यासाठी मतदान केंद्रांवर नियुक्त केलेल्या कर्मचार्यांना आज, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून मतपत्रिका व इतर साहित्याचे वाटप होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 21 उमेदवार रिंगणात आहेत, त्यातील सर्वाधिक, 9 उमेदवार नगर जिल्ह्यातील आहेत. मतदारसंघात नगरसह नाशिक, जळगाव धुळे व नंदूरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.
मतदाराची जिल्ह्यातील 20 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. नगर, संगमनेर येथे प्रत्येकी 3, राहता व कोपरगाव येथे प्रत्येकी 2 तर इतर सर्व तालुक्यातून प्रत्येकी 1 मतदान केंद्र आहेत. नाशिक विभागात एकूण 90 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावरून ‘वेब कास्टिंग’ची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर 5 याप्रमाणे नगर जिल्ह्यात 100 वर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. क्षेत्रीय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी आहे तर मतदान करताना ते प्राधान्यक्रमाने करावे लागणार आहे. मतदान संपल्यानंतर जिल्ह्यातील सर्व मतपेट्या राहाता येथे संकलित करून त्यानंतर मतमोजणीसाठी नाशिकला रवाना केल्या जाणार आहेत. मतमोजणी 1 जुलैला अंबड (नाशिक) येथील एमआयडीसीच्या गोदामात होणार आहे.