सारिपाट / शिवाजी शिर्के
उमेदवारी माघारीचा दिवस संपताच अभिषेक कळमकर वगळता जिल्हाभरातील बहुतांश प्रमुख उमेदवारांनी प्रचाराच्या तोफांची गती वाढवली असल्याचे दिसते. आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या असताना मीच कसा कामाचा हे पटवून देण्यातही आता उमेदवार आणि त्यांचे समर्थक आघाडीवर आले असल्याचे दिसते. त्या- त्या मतदारसंघातील प्रमुख देवस्थांनांना साक्षी ठेवून नारळ वाढवताना त्या- त्या मतदारसंघातील प्रलंबीत प्रश्न आणि दहशतीचे मुद्दे पुढे आणले जात आहेत. बहुतांश गावांमधून सार्याच उमेदवारांना आम्ही तुमचेच असे सांगणारे मतदार त्यांच्या मनातील बात बोलायला तयार नाहीत. बोलण्यापेक्षा मतदान यंत्रावरील बटन दाबून आपला निर्णय सांगण्याच्या मूडमध्ये आलेल्या मतदारांना आपलेसे करुन घेण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांची धावपळ सध्या चालू आहे.
अभिषेक कळमकर नुरा कुस्तीतील पहिलवान तर नाही ना!
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर नगरची उमेदवारी आपल्यालाच असल्याचे सांगणार्या अभिषेक कळमकर यांना प्रत्यक्षात उमेदवारी मिळाली असली तरी नाराजीच्या नाकदुर्या काढण्यातच त्यांचा मोठा वेळ गेला. अभिषेक नको, असा ना-ना चा पाढाच त्यांच्या मागे लागला. त्यातून वातावरण खराब झाले. काहीही झाले तरी लढायचं असं सांगणार्या कळमकर यांच्या विरोधात शशिकांत गाडे यांनी माघार घेतल्यानंतर जगताप विरुद्ध कळमकर अशी सरळ लढत अंतिम झाली. मात्र, तरीही गेल्या दोन दिवसात कळमकर यांच्यासाठीच्या हालचाली गतीमान झाल्याचे दिसून आले नाही. कळमकर यांना नक्की काय अपेक्षीत आहे, असा प्रश्न आता त्यांच्याच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेकडून उपस्थित केला जात आहे. विरोधी उमेदवार संग्राम जगताप यांचा पाचवा राऊंड सुरू झाला असताना कळमकर पहिल्या राऊंडला देखील बाहेर पडायला तयार नसतील तर ही निवडणूक नुरा कुस्ती तर नाही ना, अशी शंका आता नगरकरांनाच येऊ लागली आहे.
साजनच्या सल्ल्याने चाललेल्या नागवडेंची वाट झाली अधिक बिकट!
सार्या राजकीय पक्षांकडे उमेदवारी मागून सरत्याशेवटी अपक्ष उमेदवारीच्या तयारीत असताना साजन पाचपुते सापडला आणि शिवसेनेचे शिवबंधन हाती आले. यानंतर दोन मिनिटात उमेदवारी जाहीरही झाली. त्यासाठी १५ पेक्षा जास्त खोक्यांच्या मोलाची गोष्ट झाली. उमेदवारी मिळाली तरीही महाविकास आघाडीत स्मशान शांतता! आता ज्यांनी उमेदवारी दिली म्हणजेच ज्यांच्याकडून मिळवली ते संजय राऊत हे श्रीगोंद्यात येत आहेत! राऊत, काय बोलणार यापेक्षा नगर शहर, पारनेर आणि नगर तालुक्यातील हक्काच्या शिवसैनिकांना अंधारात ठेवून त्यांनी ज्यांना उमेदवारी दिली त्यांचे शिवसेना वाढीसाठीचे योगदान काय या प्रश्नाचे उत्तर ते देणार आहेत का? ज्या अनुराधा नागवडे यांना उमेदवारी दिली, त्यांना श्रीगोंद्यात अत्यंत अल्पसा प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेचे पदाधिकारी तर बाजूलाच झाले आहेत. पैशांच्या जोरावर सारे काही विकत घेता येतो हे दाखवून देण्यासाठी राजेंद्र नागवडे हे साजन पाचपुतेच्या सल्ल्याने सध्या कार्यरत असल्याचे दिसते. मात्र, मतदार त्यांचा स्वाभिमान असा विकत देतील का?, कायम मग्रुरी आणि मस्तीत राहिलेले आज पायाला वाकत असल्याचे दिसत असले तरी साजनच्या सल्ल्याने विजयाची स्वप्ने पाहणारे उद्या या तालुक्यात काय दिवे लावणार आहेत याचीच चर्चा रंगत आहे.
शंकरराव गडाख अवाक्षर बोलायला का तयार नाहीत?
यशवंतराव गडाखांनी कोणाला कशी मदत केली याचा पाढा बाळासाहेब मुरकुटे आणि विठ्ठलराव लंघे सध्या मतदारसंघात वाजवत आहेत आणि हाच विषय सध्या चर्चेत आहे. दोघांवरही यशवंतरावांचे उपकार असताना आज हे दोघेही कृतघ्नतेच्या भावनेतून गडाखांच्या विरोधात उभे ठाकल्याचे नेवासेकरांना रुचलेले नाही. अडीच वर्षातील मंत्रीपदाच्या माध्यमातून कामे केली असताना उर्वरीत अडीच वर्षात सत्ता गेल्यानंतर मुळा शिक्षण संस्था, कारखाना या तालुक्याच्या आर्थिक प्रगतीचे केंद्रबिंदू राहिलेल्या संस्थांवर घाला घालण्याचे काम झाले. त्यासाठी सर्वात आघाडीवर राहिलेल्या बाळासाहेब मुरकुटे यांनी शिक्षण संस्था अडचणीत आणल्याचे आणि त्यांच्यामुळेच ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यावर गुन्हा दाखल होण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण चर्चेत आले. आता मुरकुटे आणि लंघे हे दोघेही आमनेसामने आले आहेत. त्यांच्याकडून गडाखांवर आरोप होत असले तरी नेवासेकरांना त्या दोघांचाही द़ृष्ट हेतून लक्षात आल्याचे दिसते. शंकरराव गडाख या दोघांच्या बद्दल सध्यातरी अवाक्षर बोलायला तयार नाहीत. मुरकुटे- लंघे यांच्या आरोपांना गडाख उत्तर देतात की मतदार मतदान यंत्रातील बटनातून उत्तर देतात हे पहावे लागणार आहे.
संग्राम जगताप आणि आशुतोष काळे या दोघांच्या घड्याळाचं टायमिंग जुळलं!
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरमधील उमेदवार संग्राम जगताप आणि कोपरगावमधील उमेदवार आशुतोष काळे या दोघांच्याही मतदारसंघात अटीतटीची लढत होईल असा अंदाज बांधला जात होता. मात्र, प्रत्यक्षात असे काहीच होणार नसल्याचा अंदाज नगर सह्याद्रीने एक महिन्यापूर्वीच मांडला होता. आज तो अंदाज खरा ठरत असल्याचे दिसते. काळे- कोल्हे यांच्यात लढत झाली असती तर काळे यांना परिश्रम घ्यावे लागले असते. तसेच नगरमध्ये जगताप- कोतकर यांच्यातील लढतीत झाले असते. कोल्हे यांनी माघार घेतल्यानंतर आणि इकडे कोतकर यांनी माघार घेतल्यानंतर दोघांचीही निवडणूक एकतर्फी झाल्याचे दिसत असताना हे दोघेही कोणतीच रिस्क घ्यायला तयार नाहीत. दोघांनीही चार- पाच महिन्यांपासूनच हायटेक यंत्रणेच्या आधारे मतदारांच्या गाठीभेटीचे पाच-पाच राऊंड पूर्ण केले होते. आता प्रत्यक्ष निवडणूक चालू असताना तीन- तीन राऊंड पूर्ण करणार्या या दोघा युवा आमदारांनी अजित पवार यांच्या गटातील दोन फिक्स आमदारांची जागा घेऊन टाकल्याचे दिसते.
राहुरीकरांना शिवाजीराव कर्डिले यांची भावनिक साद अन् जोडीला…!
पाच वर्षापूर्वी राहुरीच्या मैदानात प्राजक्त तनपुरे आले. त्यावेळी त्यांची ती पहिलीच निवडणूक होती. शिवाजीराव कर्डिले यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नरेटीव्ह त्यावेळी पसरवले गेले. आता यावेळी हे दोघेही आमनेसामने आले आहेत. अपक्ष उमेदवार असले तरी खरी लढत होणार आहे ती कर्डिले- तनपुरे यांच्यात! यावेळी दोघांनीही प्रचंड काळजी घेतली असली तरी कर्डिले यांनी भावनिक कार्ड पुढे करत तनपुरे यांच्याकडून पेड कार्यकर्त्यांचा होणारा वापरल, दिली जाणारी दमबाजी, सत्तेच्या अडीच वर्षात मामाच्या जिवावर मिळालेले राज्यमंत्रीपद, त्या माध्यमातून विरोधकांना दिलेला त्रास आणि मिळवलेली माया आदी मुद्दे थेटपणे मांडले आहेत. तनपुरे यांच्याकडून याला अद्यापतरी कोणतेच उत्तर आलेले नाही. तनपुरे हे बॅकफुटवर गेल्याचेच यातून समोर आले आहे. निवडणुकीचा खरा प्रचार अद्याप समोर येणार असताना त्यास तनपुरे हे कसे उत्तर देतात हे पहावे लागणार आहे. तूर्तास तरी शिवाजीराव कर्डिले यांनी भावनेचे कार्ड खेळताना तनपुरेंच्याकडून दिला गेलेला त्रास हा मुद्दा समोर आहे.
प्रस्थापितांच्या विरोधातील संदेश कार्ले का भावू लागलेत पारनेरकरांना?
पाच वर्षापूर्वी प्रस्थापितांच्या विरोधात लढणारा सामान्य कुटुंबातील साधा माणूस अशी प्रतिमा निलेश लंके यांची होती. सामान्यांना सहजासहजी त्यांचा अॅक्सेस होता. कोणीही फोन करायचे आणि ते उपलब्ध व्हायचे! त्याच शिदोरीवर ते आमदार झाले आणि दोन-तीन महिन्यांपूर्वी खासदारही झाले. खासदारकीच्या निवडणुकीत माझ्यानंतर तूम्हीच आमदार असा शब्द त्यांनी काहींना दिला. त्यात माझे नाव होते आणि मला त्यांनी शब्द दिला असल्याचे संदेश कार्ले हे लोकसभेच्या निवडणुकीपासून सांगत होते. विधानसभेची निवडणूक जाहीर होताच लंके यांनी त्यांच्या पत्नीची उमेदवारी अंतिम केली. त्यातुन संदेश कार्ले, डॉ. श्रीकांत पठारे यांच्यासह शिवसैनिकांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली. सामान्य कुटुंबातील आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कार्ले यांनी अपक्ष उमेदवारी ठेवली आणि शिवसैनिकांवर झालेला अन्याय मी दूर करणार अशी साद घातली. पाच वर्षापूर्वी नीलेश लंके हे प्रस्थापितांच्या विरोधात लढले आणि ते बघताबघता प्रस्थापित झाले. तेच खासदार आणि त्यांची पत्नीच आमदार, म्हणजेच सारे काही त्यांनाच हवंय! मतदारसंघात दुसरा कोणीच नाही का असा सवाल थेटपणे कार्ले यांनी उपस्थित केलाय! पारनेकरांना कार्ले भावतात की कसे हे पाहण्यासाठी काही दिवस जावू द्यावे लागणार आहेत.