अहमदनगर । नगर सहयाद्री-
मतदारांनो सावधान! मतदान करायला जाताना मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट असणार आहेत. एका बॅलेट युनिटवर १६ उमेदवारांची नावे बसत असल्याने इतर उमेदवारांची नावे दुसर्या बॅलेट युनिटवर असणार आहेत. दोन्ही बॅलेट युनिट शेजारी शेजारी ठेवण्यात येणार आहे. परंतु, उमेदवारांकडून प्रामुख्याने आपल्याला मिळालेला क्रमांकच सांगितला जात आहे. मतदारांचा मतदान केंद्रावर गोंधळ होवू शकतो. त्यामुळे अशिक्षित लोकांना मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट असल्याने विशेष काळजी घ्यावी जाणार आहे.
अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. मतदान वाढीसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध स्पर्धा घेतल्या जात आहेत. तसेच विविध कार्यक्रमातून मतदानाचा टक्का वाढविण्याचे प्रबोधन केले जात आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात २५ उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. परंतु, एका बॅलेट युनिटवर १६ उमेदवारांची नावे व चिन्ह बसत असल्याने एका मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट असणार आहेत. पहिल्या बॅलेट युनिटवर एक ते १६ नंबरपर्यंत असलेल्या उमेदवारांची नावे असणार आहेत. तर दुसर्या बॅलेट युनिटवर १७ ते २५ पर्यंत असलेल्या उमेदवारांची नावे असणार आहेत.
मात्र, लोकसभेच्या रिंगणात असणार्या उमेदवारांकडून आपल्या नंबरचाच प्रचार केला जात आहे. तसेच आपल्या नंबरपुढील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले जात आहे. असे असले तरी मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट असल्याने अशिक्षित मतदारांचा मतदान केंद्रावर गोधळ होवू शकतो. त्यामुळे उमेदवारांच प्रतिनिधींना अशिक्षित मतदारांचा गोंधळ होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.