कोपरगाव | नगर सह्याद्री
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी शुक्रवारी उमेदवार अर्ज दाखल केला. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांनाच नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी कोेपरगावच्या माजी आमदार, भाजपा नेत्या स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शुक्रवारी सकाळी विवेक कोल्हे यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करीत श्रीमती सिंधुताई उर्फ माई कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे आशिर्वाद घेतले. याप्रसंगी रेणूका कोल्हे यांनी त्यांचे औक्षण केले.
त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान या मतदारसंघात विवेक कोल्हेंसह, विखे पाटलांचे बंधू राजेंद्र विखे, विद्यमान आमदार किशार दराडे यांच्या नावाची चर्चा आहे. या निवडणुकीमध्ये अर्ज भरण्यासाठी ७ जून पर्यंत मुदत आहे. १० जूनला छाननी, १२ जूनपर्यंत माघारीची मुदत आहे. २६ जून रोजी मतदान आणि १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. या मतदारसंघातून कोण कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.