नवी दिल्ली | वृत्तसंस्था
गेल्या आठवड्याभरात भारतीय क्रिकेट चाहत्यांना दोन मोठे धक्के बसले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. क्रिकेट चाहते या धक्क्यातून बाहेर पडणार, त्याआधीच विराटने चाहत्यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून भावूक पोस्ट शेअर करून विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. विराटच्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, येत्या जून महिन्यात भारतीय संघ 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा पाहता बीसीसीआयने त्याला आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली होती. मात्र, विराट आपल्या निर्णयावर ठाम राहिला. अखेर त्याने 14 वर्षांच्या कसोटी कारकिदला पूर्णविराम दिला आहे. विराटच्या निवृत्तीनंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
भावूक पोस्ट शेअर करत विराटचा कसोटी क्रिकेटला रामराम
विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. त्याने आपल्या पोस्टला कॅप्शन देत लिहिले की, मला कसोटी क्रिकेटमधील बॅगी ब्लू परिधान 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. खरं सांगू तर, हा प्रवास मला कुठे नेईल, याची मला काहीच कल्पना नव्हती. या फॉरमॅटने माझी कसोटी घेतली, घडवलं आणि असे धडे दिले जे इथून पुढील आयुष्यातही मला कामी येतील.तसेत त्याने पुढे लिहिले की, पांढरे कापडे घालून खेळणं विशेष असतं. या फॉरमॅटपासून दूर जाण्याचा निर्णय मुळीच सोपा नव्हता, पण योग्य वाटतो. मी या खेळासाठी सर्वकाही दिलं. त्याहून अधिक या खेळाने मला परत दिलं. मी कृतज्ञनेच्या भावनेनं भरलेल्या हृदयानं या प्रवासातून बाहेर पडतोय. कसोटी क्रिकेटमधील माझा प्रवास, कायम हसत आणि अभिमानानं आठवत राहिल.
अशी राहिली कसोटी कारकिर्द
* 2011 मध्ये कसोटी कारकिदला सुरूवात
* 123 कसोटी सामने * 210 डावात 9230 धावा
* 30 शतकं 31 अर्धशतकं * नाबाद 254 धावा
* कसोटी कारकिदतील सर्वोत्तम खेळी