अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
ज्या पद्मभूषण आण्णा हजारे यांच्या मुळे ग्रामसभेला सर्वाधिकार प्राप्त झाले, त्यांच्याच पारनेर तालुक्यात मात्र प्रशासनाकडून ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवत, खाजगी कंपनीचे लांगुलचालन केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील अस्तगाव येथे खाजगी कंपनीच्या प्रस्तावित पोल्ट्री व कत्तलखान्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत ग्रामसभेत तसा ठराव केला आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबत काहीच कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
निसर्गाचे वरदान लाभलेल्या अस्तगाव शिवारात ऊर्जा फूड या कंपनीने पोल्ट्री शेड्स व कत्तलखान्याचे बांधकाम सुरु केलेले आहे. या मुळे गावच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होवून गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे या कंपनीला ना हरकत देवू नये अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तरीही तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायत सदस्यांना व ग्रामस्थांना विश्वासात न घेता १९ जून २०२४ च्या मासिक मिटिंगच्या इतिवृत्तात या कंपनीला ना हरकत देण्याचा ठराव घुसडून बेकायदेशीरपणे ना हरकत प्रमाणपत्र दिले. याची माहिती मिळताच ३१ जुलै २०२४ च्या मासिक मिटिंग मध्ये सर्व सदस्यांनी हा ठराव तहकूब करून याबाबत ग्रामसभेत निर्णय घेण्याचा ठराव केला. १ ऑगस्ट २०२४ रोजी उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी पारनेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना सदर ठराव विखंडीत करण्याचे पत्रही दिले.
त्यानंतर लगेच तत्कालीन सरपंच लताबाई काळे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला. तो ६ ऑगस्ट २०२४ रोजी मंजूरही झाला. त्यानंतर रेश्मा केशव काळे यांची सरपंच पदी निवड झाली. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत उर्जा कंपनीला दिलेली ना हरकत रद्द करण्याचा ठराव घेण्यात आला. तरीही कंपनीचे काम सुरुच असून याबाबत ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस प्रशासन यांना निवेदने दिली.
तर ग्रामस्थ तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील – सरपंच रेश्मा काळे
त्यानंतर कंपनीने केलेल्या बांधकामाची नोंद लावण्यासाठी ग्रामपंचायतला पत्र दिले. हा विषयही जुलै २०२५ मध्ये झालेल्या ग्रामसभेत ना मंजूर करण्यात आला आहे. या दरम्यान तहसीलदार गायत्री सैंदाणे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या विरोधाची दखल घेत उचित कार्यवाही करण्याचे पत्र दिले. तरीही गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला या बांधकामाची नोंद लावण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. वरिष्ठ कार्यालयाने ग्रामस्थांचा विरोध डावलून कंपनीला सहाय्य करण्याचा प्रयत्न केला तर ग्रामस्थ आक्रमक पणे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील असा इशारा सरपंच रेश्मा काळे यांनी दिला आहे.
ग्रामस्थांनाच खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या
ग्रामपंचायतने कंपनीच्या बांधकामाची कुठलीही नोंद दप्तरी लावलेली नाही, तसेच या बांधकामास मासिक सभेने आणि ग्रामसभेने मंजुरी नाकारली असून सदर बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे याबाबतची नोटीस घेवून ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ हे कंपनीच्या चालू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी गेले असता तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोटीस घेतली नाही. त्यामुळे तेथे नोटीस डकविण्यात आली असता या मुजोर अधिकारी कर्मचाऱ्यांनी ती सर्वांसमोर फाडून टाकत खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.