पंधरा दिवसांपासून खंडित वीजपुरवठ्याने शेतकरी हैराण, महावितरणविरोधात आंदोलन
पारनेर । नगर सहयाद्री:-
गेल्या पंधरा दिवसांपासून खडकवाडी (ता. पारनेर) येथील शेतीपंप आणि घरगुती वीजपुरवठा सुरळीत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी (५ ऑगस्ट २०२५) सकाळी ७ वाजता खडकवाडी सबस्टेशनवर ठिय्या आंदोलन केले. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र रोकडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयात धडक देत निषेध नोंदवला. यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.
आंदोलनात निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रवींद्र राजदेव, पळशी गावचे सरपंच प्रकाश राठोड, माजी सरपंच संतोष जाधव, पोपट गागरे, ज्येष्ठ नेते सुभाष ढोकळे, विष्णू शिंदे, कैलास आग्रे, शिवाजी शिंगोटे, बाबासाहेब गागरे, धनंजय चौधरी, गणेश बिचारे, तुकाराम ढोकळे, महादू ढोकळे, काशिनाथ ढोकळे, संकलेश औटी, सतीश ढोकळे, अमोल म्हस्के, विशाल गागरे, संतोष हुलावळे, संपत गागरे, अनिल गागरे, गणेश हिंगडे, सारंग रोकडे आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.
माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी शरद गहांडुळे आणि अजय बासनीवाल यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतकऱ्यांनी वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत जाब विचारला. “वीजपुरवठा सुरळीत का होत नाही? शेती आणि घरगुती गरजांसाठी आम्हाला त्रास का सहन करावा लागतो?” अशी प्रश्नांची सरबत्ती अधिकाऱ्यांवर झाली. अखेर, अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यावर शेतकऱ्यांनी ठिय्या मागे घेतला. या घटनेने महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, ग्रामस्थांनी यापुढे वीजपुरवठा खंडित झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
खडकवाडी येथे वीज पुरवठया मध्ये सुरू असलेल्या समस्या लक्षात घेऊन लवकरच वीजपुरवठा सुरळीत करू खडकवाडी व टाकळी ढोकेश्वर हे दोन सबस्टेशनला वीज पुरवठा बाभुळवाडा सब स्टेशन वरून करण्यात येतो. सब स्टेशन वर येत असलेला लोड लक्षात घेऊन लवकरच यावर तोडगा काढू ग्रामस्थांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही.
शरद गहांडुळे (महावितरण, पारनेर)
खडकवाडी व टाकळी ढोकेश्वर परिसरामध्ये गेल्या एक ते दीड महिन्यापासून विजेचा खेळ खंडोबा सुरू आहे. वीज पुरवठा सुरळीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पाऊस नसल्यामुळे शेती पिकाला पाणी भरण्यासाठी वीज गरजेचे आहे परंतु तिचा पुरवठा हा पूर्ण दाबाने होत नाही. वीज पुरवठा या पुढील काळात सुरळीत झाला नाही तर आंदोलन करू.
रवींद्र राजदेव (उपाध्यक्ष, निलेश लंके प्रतिष्ठान, पारनेर)