मतदारसंघात विकास कामांच्या जोडीने शांतता नांदावी, द्वेष-मत्सर कमी व्हावा आणि सलोख्याचे वातावरण कायम राहण्याची गरज / झुंडशाही अन् दबंगगीरीने गावागावात कलह | पारनेरची वाटचाल पुन्हा एकदा घराणेशाहीकडे मतदार होऊ देणार नाहीत
थेट भेट / शिवाजी शिर्के
प्रस्थापितांच्या विरोधात मतांचा जोगवा मागता- मागता विस्थापित म्हणवून घेणारे प्रस्थापित झाले. प्रस्थापित होताना मी आणि माझ्याच घरात सार्यांना पदे अशी भूमिका घेतली. पारनेरमधील सक्रिय राजकारणात मागे वळून पाहताना गेल्या चाळीस वर्षात कधीही आजच्या सारखी दहशत, भिती आणि दडपशाही नव्हती. गत पाच वर्षात मी म्हणेल तीच पूर्वदिशा, अशी हुकुमशाही भूमिका घेताना वेगळ्या विचारधारेचा कोणी बोलू लागला तर त्याला लागलीच आडवा करण्याची अपप्रवृत्ती थांबावी, कोणी विरोधी भूमिका घेतली तर त्याच्या विरोधात मोहीम राबविण्याची अपप्रवृत्ती थांबावी आणि मतदारसंघात विकास कामांच्या जोडीने शांतता नांदावी, द्वेष-मत्सर कमी व्हावा आणि सलोख्याचे वातावरण कायम राहण्याची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने माझे मतदारांना आवाहन आहे की, एकाधिकारशाही हवी की लोकशाही हे तुम्हीच ठरवा! घराणेशाहीच्या विरोधात पाच वर्षापूर्वी बोंब ठोकली आणि ती निवडणूक जिंकली! आता मी त्याच संभाव्य लादल्या जाणार्या घराणेशाहीच्या विरोधात उमेदवारी केली आहे. मतदारांनी निर्णय घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी ते कोणाच्याही दबावाला बळी न पडता करणार यात आता मला शंका राहिलेली नसल्याचा विश्वास पारनेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार काशिनाथ दाते यांनी ‘नगर सह्याद्री’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.
पाटपाण्याच्या विषयावर ते चकार शब्द बोलले नाही, कारण त्यांना वेळच नाही!
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पडणारे पश्चिमेकडे वाहन जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याची स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या संकल्पनेतील योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तालुयातील १६ गाव पाणीयोजनेला मुळा धरणातून पाणीपुरवठा व्हावा, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मांडओहळ धरणाचा पाणीसाठा संपल्यावर ही योजना बंद होत असल्याने दुष्काळी परिस्थितीत मुळा धरणातून शाश्वत पाणीपुरवठ्याची सोय या माध्यमातून होऊ शकते. पठार भागाला पाणीपुरवठ्यासाठी सौरऊर्जेवर चालणारे पंप बसवून ही योजना मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. गेल्या पाच वर्षात घाटमाथा, सह्याद्री, पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी हे शब्द त्यांना उच्चारता देखील आले नाहीत. या विषयांवर मी अभ्यास केला असून त्याची सोडवणूक करण्यावर माझा भर असणार आहे.
दहशत मोडून काढण्यासाठी जीवाची बाजी लावण्यास मी तयार
सुसंस्कृत विचाराचा हा तालुका बघता-बघता वेगळ्या विचाराचा झाला. कोणीच येथे काम करण्यास तयार नाही. प्रशासनातील अधिकार्यांमध्येही येथे दहशत आहे. त्याची झळ शेवटच्या घटकाला देखील बसते. गावागावातील छोट्या-मोठ्या व्यवसायिकांकडून वर्गणीच्या नावाखाली खंडणी जमा करणारे महाभाग गेल्या पाच वर्षात तयार झाले. काहींनी हप्ते सुरू करून घेतले. या तालुक्याची वाटचाल नक्की कुठे चालू आहे? दहशत मोडून काढण्यासाठी आता कंबर कसावी लागेल आणि त्यासाठी जीवाची बाजी लावण्यास तयार आहे. शेवटी कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्यासाठी माझा जिव गेला तरी माझी तयारी आहे.
महिला तहसीलदार, महिला आरोग्य अधिकारी या नव्हत्या बहिणी?
प्रशासन प्रमुख म्हणून काम करताना आपले कर्तव्य बजावत जनतेची सेवा करणार्या महिला तहसीलदाराबाबत काय घडले? पारनेरच्या महिला आरोग्य अधिकार्याबाबत काय घडले? कोविड सेंटरमध्ये कोणाकोणाला मारहाण झाली? जलमिशनच्या अधिकार्यांना मारहाण का झाली? अधिकारी- कर्मचार्यांना मारहाणच बंद नाही. तहसीलदार, आरोग्य अधिकारी या महिला असताना त्यांना मारहाण करणार्यांना त्या बहिणी वाटल्या नाहीत का?
बांधकाम समितीच्या माध्यमातून तीनशे कोटींची कामे मार्गी लावली
जिल्हा परिषदेत बांधकाम समिती सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करण्याचा मी प्रयत्न केला. पारनेर तालुक्यात आणि शेजारी नगर तालुक्यात अनेक कामे मार्गी लावली. विशेषत: रस्ते आणि सभामंडपासह अन्य विकास कामे करताना त्या कामांचा फायदा जनतेला झाला. दळणवळणाची सुविधा निर्माण झाली. जवळपास तीनशे कोटी रुपयांची कामे मार्गी लावताना त्यात या मतदारसंघात काम झाले नाही असे एकही गाव आढळून येणार नाही.
झुंडशाहीला लगाम घालण्यासाठी पुढे या!
वैचारिक बैठक असणार्या तालुक्याची ओळख गेल्या पाच वर्षात का पुसली आणि कोणी पुसली या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वांनाच करावे लागणार आहे. पाच वर्षापूर्वीची दुरूस्ती करण्याचे काम करण्याचा निर्धार आता सार्यांनी मिळून करण्याची गरज आहे. काही गोष्टींना वेळीच आवर घालावा लागेल आणि तसे झाले तर पुन्हा फक्त पश्चाताप आणि पश्चातापच हाती येणार असल्याचे जनतेने ओळखले आहे.
पाच वर्षापूर्वीची चूक दुरुस्त होणार!
पाच वर्षापूर्वी तत्कालीन लोकप्रतिनिधीच्या विरोधात लाट होती. त्यांच्याकडून झालेला प्रत्येकाचा पानउतारा, अपमान याच्याच जोडीने त्यांच्या स्वभावाचे भांडवल करण्यात आले. त्याला कोणीही काहीच उत्तर देऊ शकले नाही. पर्यायाने मोठी लाट निर्माण झाली आणि लंके यांना संधी दिली गेली. त्यांच्या जनतेच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, त्यांनी त्यांची साडेचार वर्षे ही गावागावात भांडणे लावण्यात आणि जिरवाजिरवी करण्यातच घालवली. पाच वर्षापूर्वी भावनिक होऊन मतदान केलेल्यांना आता ही चूक लक्षात आली आहे. त्यांना घराणेशाही नकोय आणि मतदारसंघात झुंडशाही, दादागिरी देखील नको आहे.
कुटुंबातच सारी पदे घेणार असाल तर तुम्ही देखील प्रस्थापितच!
प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आमदार झाला, खासदार झाला! आमची वैचारीक बैठक आणि राजकीय भूमिका जरी वेगळी असली तरी त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंंदनच! मात्र, आता खासदारकी मिळाल्यानंतर सामान्य कुटुंबातील दुसर्या कोणालातरी ते उमेदवार म्हणून पुढे आणतील असे सामान्य कार्यकर्त्याला वाटत असताना प्रत्यक्षात त्यांनी पत्नीची उमेदवारी केली. आता येणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकी त्यांचा भाऊ, वहिणी, मुले यांचा प्रचार करायचा का, असा प्रश्न त्यांचेच समर्थक आता उपस्थित करु लागले आहेत आणि त्यातूनच ते त्यांची साथ सोडून माझ्यासोबत आले आहेत.
अधिकारी- कर्मचार्यांना प्रेमाने वागवेल आणि कामे मार्गी लावून घेईल, हा माझा शब्द!
शिव्याशाप अन् लाथाबुक्यांसह दांडक्याची भाषा गेल्या पाच वर्षात प्रशासनातील विविध विभागातील काम करणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांना लोकप्रतिनिधीने वापरली. गावचा ग्रामसेवक, तलाठीच काय अगदी अंगणवाडी सेविका देखील यातून सुटली नाही. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ‘तुमचा बाप येतोय’ ही भाषा वापरली गेली. या निवडणुकीच्या निमित्ताने मी प्रशासनातील सर्व अधिकारी- कर्मचार्यांना शब्द देतो की, तुमच्याशी मी प्रेमानेच वागेल आणि त्याच प्रेमाने कामे मार्गी लावून घेईल.
तालुक्यात अधिकारी यायला का घाबरतात हे समजून घ्या!
गेल्या पाच वर्षात तहसीलदार, गट विकास अधिकारी, पोलिस निरीक्षक यासह बांधकाम, पाटबंधारे, कृषी, नगरपंचायत यासारख्या विभागात प्रशासन प्रमुख म्हणून काम करण्यास बदलीने यायला अधिकारी तयार नाहीत. अधिकार्यांना कायम घोडे- कुत्रे आणि चुकीची कामे करण्यास प्रवृत्त करण्याची वृत्ती गेल्या पाच वर्षात वाढली. अधिकार्याने चुकीचे, नियमबाह्य काम करण्यास नकार दिला की त्याच्या विरोधात अर्ज, त्याला अडकविण्याचा प्रयत्न आणि आम जनतेसमोर त्याला शिव्या देण्याचे प्रकार घडलेत! चांगले अधिकारी त्यामुळे तालुक्यात यायला तयार नाहीत. त्यामुळे बहुतांश कार्यालयांमध्ये प्रभारी अधिकारी आहेत. त्यातून अनेक कामे मार्गी लावण्यात विलंब होतो आणि त्याची किंमत सामान्य जनतेला मोजावी लागते.
अण्णांचा तालुका म्हणून पुन्हा ओळख निर्माण करावी लागेल!
गेल्या पाच वर्षात पारनेरमधील दहशत, प्रशासनाला हाताशी धरुन दिलेला त्रास आणि कायम खुनशी राजकारण यामुळे तालुक्याची वाटचाल नक्की कुठे चालली आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. अण्णासाहेब हजारे यांचा हाच का तो पारनेर तालुका असे आता राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून विचारला जात आहे. शांत, संयमी आणि वैचारिकदृष्ट्या सक्षम असणार्या या तालुक्याला नवी ओळख आणि नवी दिशा देण्यासाठी आता सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे.
लोकसभेला पैशाचा धूर काढणार्यांची गरीबी कधीच संपलीय!
पाच वर्षापूर्वी फकीर असल्याचे सांगत मतांचा जोगवा मागणार्यांनी लोकसभा निवडणुकीत पैशांचा धूर काढला. खरे तर ते कधीच गरीब नव्हते. बँक खाते आणि बँक बॅलन्सचे आकडे हा फक्त दिखावा आहे. फॉर्च्युनर आणि अन्य अलिशान गाड्यांना कार्यकर्ते डिझेल टाकतात हे सांगणार्यांचा खरा चेहरा समोर आला आहेच. गरीबीचे सोंगढोंग आता जनतेला समजले आहे. त्यांच्यासारखी गरीबी सर्वांना यावी इतकेच म्हणायचे बाकी आहे.
दहशतमुक्त मतदारसंघ करण्यासाठी मी उभा
विकास कामांपेक्षा प्रसिद्धीचा स्टंट पाच वर्षे जनतेने अनुभवला! गावागावात व्हॉटसअप ग्रुप चालवणारे पेड कार्यकर्ते तयार झाले. त्यांना मानधन देण्यात येते आणि त्यांच्याच माध्यमातून गावागावात स्टंटबाजी आणि दहशतीचे राजकारण केेले जात आहे. तालुक्यातील जनता खर्या अर्थाने बुद्धीजीवी आणि सुसंस्कृत असून त्यांना गेल्या पाच वर्षात जे काही घडले ते अजिबात मान्य नाही. सुप्त लाट संपुर्ण मतदारसंघात आहे. त्याचा प्रत्यय मतमोजणीच्या दिवशी सर्वांना दिसेल. पारनेर मतदारसंघातील दहशत मोडून काढण्यासाठी माझी उमेदवारी आहे.
परिवर्तनाची एक सुप्त लाट मतदारसंघात आलीय!
विकास आणि विकास हाच या निवडणुकीत आपला प्रमुख मुद्दा आहे. पारनेर मतदारसंघाचा गेल्या पाच वर्षांत विकासाचा गाडा पूर्णपणे ठप्प झाला आहे. बुद्धिजीवी व सुसंस्कृत लोकांच्या या मतदारसंघात दहशतीचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. लोक या विरोधात उघडपणे बोलू शकत नसले तरी पाच वर्षांपूर्वी झालेली ही चूक सुधारण्याच्या मनःस्थितीत आहेत. त्यामुळे परिवर्तनाची एक सुप्त लाट मतदारसंघात दिसून येत आहे.
नंदकुमार झावरे, वसंतराव झावरे अन् विजयराव औटींची
विकास कामांची परंपरा खंडीत झाली!
दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणार्या तालुक्यात विविध विकास कामे मार्गी लावताना या तालुक्याची दुष्काळी तालुका ही ओळख पुसण्याचे काम खर्या अर्थाने तत्कालीन आमदार नंदकुमार झावरे, स्वर्गीय वसंतराव झावरे, विजयराव औटी यांनी केले. मात्र, मागील पाच वर्षात फक्त हजारो कोटी रुपयांचे आकडे जनतेला वाचायला मिळाले. प्रत्यक्षात काम मात्र काहीच झाले नाही. डांबरी रस्त्याची मागणी करणार्यांना ‘डांबरी रस्ता काय घसरून पडायला करायचा का, असे जाहीरपणे उत्तर देणारे लोकप्रतिनिधी या मतदारसंघाला लाभले आहेत. विकासकामांऐवजी प्रसिद्धीचे स्टंट झाला. लोकप्रतिनिधींच्या या चमकोगिरीला जनता अक्षरशः विटली असून त्याचे उत्तर आता मिळणार यात शंका नाही.
दिलेला शब्द न पाळल्याने पारनेरमधील शिवसैनिक
त्यांचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाहीत!
लोकसभेला मदत करण्याच्या बदल्यात अनेक शिवसेना पदाधिकार्यांना आमदारकीचा शब्द दिला गेला. खासदार म्हणून विजयी होताच त्यांनी शब्द मोडला. ज्यांना शब्द दिला त्यांना गद्दार म्हणून हिणवले. त्यांच्या मनासारखे वागले की तो चांगला आणि विरोधात गेला की गद्दार अशी त्यांची कार्यपद्धती आहे. तालुक्यातील जनता आणि शिवसैनिक स्वाभिमानी आहेत. त्यांच्या भावनांचा बाजार त्यांनी मांडला. आता हेच शिवसैनिक त्यांचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाहीत!
विधानसभेनंतर लोकसभेला पन्नास टक्के मताधिक्य घटल्याचे लक्षात घ्या!
पाच वर्षापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना साठ हजाराचे मताधिक्य होते. चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पारनेरमधून फक्त तीस हजारांचे मताधिक्य भेटले. याचाच अर्थ पाच वर्षापूर्वी झालेली चूक मतदारांनी दुरुस्त केलीय. त्यातही लोकसभा निवडणुकीत त्यांनी विखे यांच्या विरोधात फेक नरेटीव्ह सेट केले. त्यांच्याविषयी औटींप्रमाणेच अपप्रचार केला. आणखी काही मुद्देही त्यात आले. त्यातूनच काही समाज त्यांच्या बाजूने गेला. आता यावेळी तसे होणार नाही. सर्व समाज घटक माझ्या सोबत आहे. विधानसभेला नगर तालुक्यातून त्यांना ३० हजाराचे मताधिक्य होते, लोकसभेला हेच मताधिक्य अवघे चार हजारावर आले. परिवर्तनाची नांदी लोकसभेलाच झालीय! काही चुका घडल्या इतकेच! आता त्यात दुरुस्ती झाल्याचे दिसेल आणि विजयाचा गुलाल पडल्याचेही!
चाळीस वर्षांपासून जनतेशी नाळ! त्यांच्या सुखदु:खात कायम सहभागी!
नंदकुमार झावरे साहेबांच्या कारकिर्दीपासून स्व. वसंतराव दादा यांच्यासह अलिकडे विजयराव औटी यांच्या कारकिर्दीपर्यंत मी कायम त्या- त्या परिस्थितीत सोबत राहिलो. त्यांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी जी पदे मिळाली त्या पदांचा वापर मी कायम सेवेकरी म्हणूनच केला. पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती अशा विविध संस्थांवर काम करताना जिल्हा परिषदेत बांधकाम समिती सभापती म्हणून काम केल्याचा अनुभव आला. प्रशासनाकडून काम करुन घेण्याची वेगळी हातोटी असते आणि ती मला अवगत आहे.
सुपा एमआयडीसीतील गुंडाराज संपविण्यावर भर देणार!
सुपा औद्योगिक वसाहतीच्या निमित्ताने पारनेर तालुक्याची वेगळी ओळख निर्माण झाली. स्थानिक भुमिपुत्रांना न्याय मिळावा, रोजगार मिळावा या उद्देशाने तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी पुढाकार घेतला. माजी आमदार स्वर्गीय वसंतराव झावरे, तसेच विजयराव औटी यांच्या योगदानातून सुपा एमआयडीसी भरभराटीला आली. आता त्याचा चांगला विस्तारही वाढला. भूमिपुत्रांना स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण व्हावा, रोजगारासाठी मोठ्या संख्येने होणारे स्थलांतर रोखले जावे, ही त्यामागची प्रामाणिक भावना होती. मात्र, प्रत्यक्षात उलटे झाले आहे. सुपा एमआयडीसीत काही विशिष्ट टोळ्यांची मक्तेदारी निर्माण झालीय. त्यांना वरदहस्त देण्याचे काम लोकप्रतिनिधी करतात हे आणखी मोठे पाप! राजकीय वरदहस्ताच्या जोरावर अशा टोळ्या उड्या मारत असून, त्यामुळे अनेक नामवंत कंपन्यांनी येथून काढता पाय घेतलाय. एमआयडीसी उद्ध्वस्त होण्याची वेळ आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील कथीत राजाश्रय असणारे गुंडाराज संपविण्याची गरज आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून अनेक नामांकित राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांना येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.