अहमदनगर | नगर सह्याद्री
एकीकडे लोकसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. प्रचारसभांनाही वेग आला आहे तर दुसरीकडे हक्काचे पाणी मिळण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील निंबवी ग्रामस्थांनी राजकीय नेत्यांना गावबंदी तर कोरेगव्हाणकरांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
सन १९४८ रोजी तालुक्यातील विसापूर येथे ब्रिटिशकालीन तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावात निंबवी येथील सुमारे ९०० हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. परंतु या गावातील प्रकल्पग्रस्तांना अद्यापि धरणग्रस्तचा दाखला मिळाला नाही. नेतेमंडळींकडून केवळ आश्वासने मिळाली.
दरम्यान, हे गाव विसापूर तलावाजवळ असूनही यांना हक्काच्या पाण्यासाठी सतत नेत्यांच्या मागे पळावे लागते. गावाला पिण्याच्या पाण्यासाठी कोरेगव्हाणलाही नेत्यांकडून पोकळ आश्वासनेच मिळत आहेत. शेतीसाठी वेळेवर पाणी व वीज मिळवून देण्यात नेतेमंडळी अपयशी ठरली आहेत.
त्यामुळे ग्रामस्थांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार तसेच शेतीसाठीही वेळेवर पाणी व मिळत नसल्याने हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यांदेखत जळून जाताना पाहावी लागतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी गावात कोणत्याही राजकीय पक्षांचे बूथ लावायचे नाहीत. तसेच सर्व नेत्यांना गाव बंदी करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाणी टँकर्सची संख्या १९६ वर
उन्हाच्या चढत्या पार्याबरोबच जिल्ह्यातील तहानेचा ताण देखील वाढू लागला आहे. जिह्यात १९५ गावे आणि १ हजार १८ वाड्या वस्त्यांवरील चार लाख लोकांची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने १९६ टँकर्सद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. अजूनही बरीच गावे, वाडया-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे टँकरचा आकडा २०० पार जाण्याची शक्यता आहे. यंदा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जिह्यातील पाणीटंचाईची स्थिती लवकरच जाणवू लागली. त्यातच उन्हाच्या चढत्या पार्यामुळे पाणीसाठयाचा जलस्तर झपाट्याने खाली जाऊ लागला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावणाऱया गावांची आणि वाड्यांची संख्या एप्रिलमध्येच लक्षणीय वाढली आहे.