spot_img
अहमदनगरविखे साहेब, ट्राफीकचा आ..का.. आवरा!; नगरकरांच्या जीवावर उठलाय हप्तेखोरीतील ‘बाबा’!

विखे साहेब, ट्राफीकचा आ..का.. आवरा!; नगरकरांच्या जीवावर उठलाय हप्तेखोरीतील ‘बाबा’!

spot_img

अवजड वाहतूक शहरातून! एसपी साहेब, नगरकरांच्या जीवावर उठलाय तुमचा हप्तेखोरीतील ‘बाबा’! / मलिद्यासाठी हपापलेला शहर वाहतूक शाखेचा ‘बाबा’ म्हणतो, ‘मरू दे साला नगरकरांना रस्त्यावर!’

सारिपाट / शिवाजी शिर्के
नगर शहराबाहेरुन जाणारा बायपास रस्ता अत्यंत चांगला आणि दर्जेदार झाला असताना आणि शहरातून पुणे, औरंगाबाद, मनमाड, नाशिक, सोलापूरकडे जाणारी वाहतूक या रस्त्याने वळवली असतानाही केवळ आणि केवळ हप्तेखोरीच्या मागे लागलेल्या नगर शहर वाहतूक शाखेतील फौजदार असलेल्या बाबाने शहरात घातल्याचे समोर आले आहे. वाहतूक शाखेचा प्रमुख असणारा हा बाबा गेल्या काही महिन्यात अनेकदा वादग्रस्त ठरलाय! हप्तेखोरीचे कार्ड दुप्पट केल्यानंतर आता हा बाबा नामक आ..का.. नगरकरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारी अवजड वाहतूक शहरातून सुसाट सोडू लागला असल्याचे समोर आले आहे. एसपी साहेब, तुमच्या नावाखाली नगरकरांच्या जीवावर उठलेली अवजड आणि अन्य वाहतूक शहरातून सोडणार्‍या या हप्तेखोर ‘बाबा’ला आवर न घातल्यास आणखी कितीतरी बळी यातून जातील आणि त्याचे पाप तुम्हाला लागेल हे नक्की! जिल्ह्याचे जबाबदार मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी या विषयात लक्ष घालण्याची गरज आहे.

नगर शहरातून जाणार्‍या अनंत अडचणींच्या महामार्गावर मरण स्वस्त झाले असताना बायपास रस्ता तयार करण्यात आला. याच रस्त्याने वाहतूक वळवली जावी आणि अवजड वाहतूक कोणत्याही परिस्थितीत शहरातून जाणार नाही याची काळजी घ्यावी यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अनेकदा सुचना केल्या. खरेतर त्याची अंमलबजावणी होत होती. मात्र, गेल्या पंधरा दिवसात शहर वाहतूक शाखेतील बाबा नामक आकाला हप्तेखोरीतील माया कमी पडल्याची जाणिव झाली आणि त्याने ही अवजड वाहतूक शहरात सोडून दिली. त्यातून शहरात आलेली ही वाहने अडवायची आणि त्यांच्याकडून वसुली करण्याचा नवा फंडाच या आकाने सुरू केल्याचे समोर आले आहे. या बाबा नामक आकाच्या हप्तेखोरीत शहरातील वाहतुक कोंडीचे तीनतेरा वाजले आणि त्यातून होणारे अपघातही वाढले!

नगर-पुणे महामार्गावरुन केडगाव मार्गे शहरात येणारी व जाणारी अवजड वाहने ही नित्याचीच बाब झाली आहे. नगर-पुणे महामार्गावरील रेल्वे पुलावर अवजड सामानाची वाहतुक करणारा कंटेनर अचानक बंद पडल्याने वाहतुक कोंडी झाली होती. यश पॅलेस चौक ते केडगाव येथील अंबिका बस स्टॉप पर्यंत संपूर्णपणे वाहतूक ठप्प झाली होती. दोन- तीन तास नागरिक या वाहतुक कोंडीत अडकले होते. अवजड वाहनांनी शहरातील वाहतुकीचे तीन तेरा वाजले असताना बाबाच्या नेतृत्वाखालील शहर वाहतुक पोलीस बाजूला उभे राहून हप्तेखोरी करण्यात मश्गुल होते.

अवजड वाहतूक आणि त्यातून घेतले जाणारे बळी, होणारे अपघात हे नवीन नाहीत. शहरातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी, वाहतुकीच्या नियोजनासाठी काही केले पाहिजे अशी भावनाच मुळी वाहतूक शाखेचा कॅप्टन असणार्‍या बाबा मध्ये दिसायला तयार नाही. माल आणि फक्त माल कमवताना याचे मोठे पातक आपल्या कुटुंबाला देखील लागत असल्याचे भान ना त्या बाबाला आहे ना त्याचे समर्थन करणार्‍या त्याच्या टीमला! बाबा आणि त्याची टीम सुसाट सुटली असताना त्याच्या विरोधात ना शहराचे आमदार बोलायला तयार, ना आजी- माजी आणि भावी नगरसेवक बोलायला तयार! नगरकरांच्या जीवावर नक्की हा बाबा उठलाय की त्याची सुपारी घेणारे पुढारी? नगरमध्ये कोण कशाची आणि कोणासाठी सुपारी घेईल हेच सांगता येणार नाही! वाहतूक शाखेचा बाबा तरी त्यास अपवाद कसा असेल?

‘बाबा’ अन् त्याच्या टीमचा वसुलीचा नवा फंडा!
वाहतुक कोंडी व अपघातांना कारणीभूत ठरणार्‍या अवजड वाहनांना शहरात  बंदी असताना सर्रासपणे शहरात अवजड वाहने दिवसाढवळ्या येत आहे. छत्रपती संभाजीनगरकडून येणारी वाहने शेंडीबायपास जवळून वडगावगुप्ता, विळदघाट मार्गे नेप्ती मार्केटकडून पुण्याकडे आणि पुण्याहून मनमाड, नाशिक, शिर्डी, संभाजीनगरकडे जाणारी वाहने नेप्तीमार्केटकडून विळदघाट, वडगावगुप्ता- शेंडी चौकात जाणे अपेक्षीत आहे. पंधरा दिवस आधीपर्यंत ही वाहने याच बायपासने जात- येत होती. मात्र, वाहतूक शाखेच्या बाबाला खाबुगीरी कमी पडली! अन्  त्याने त्याच्या टीमच्या माध्यमातून ही वाहने त्या-त्या चौकातून बायपासला न सोडता शहरात येऊ दिली. शहरात वाहन आले की त्या वाहन चालकाला अडवून त्याच्याकडून वसुलीचा नवा फंडा या बाबा नामक आकाने राबविण्यास प्रारंभ केला आहे. त्याच्या आणि त्याच्या टीमच्या खाबुगीरीत वाहतूक कोंडी तर होतेच होते, पण त्याहीपेक्षा त्यात अनेकांचा जीव गदुमरत आहे. अपघातांची मालिका सुरू झालीय हे सांगण्याची गरज नाही. वाहतूक शाखेच्या बाबा आणि त्याच्या टीमला नगरकरांचा बळी घेण्याची, नगरकरांचा वाहतूक कोंडीत जीव गुदमरण्यास भाग पाडण्याची हौस भागवायचीच असेल तर नगरकरांच्या संतापाचा उद्रेक देखील होऊ शकतो हे लक्षात घेण्याची गरज आहे.

शहरातून बाहेर पडणार्‍या प्रत्येक रस्त्यावर होते वसुली!
नगर शहरातून बाहेर पडणार्‍या रस्ते आणि महामार्गावर साधारणपणे दोन- तीन किलो मिटर अंतरावर खाकी पँट, पांढरा शर्ट घातलेले, सोबतीला पूर्ण खाकी गणवेश घातलेले दोन- तीन पोलिस कर्मचारी असतात. हे पोलिस कर्मचारी वाहतूक शाखेचेच असतात. वास्तविक या कर्मचार्‍यांना शहराबाहेर जाऊन वाहन अडवणे, तपासणे आणि त्या वाहन चालकाची लुट करण्याचा कोणताही कायदेशिर अधिकार नाही. मात्र, तरीही ‘बाबा’ंच्या आदेशाने रोजचे वसुली टार्गेट पूर्ण करण्यासाठी हे कर्मचारी शहरातून बाहेर जाणार्‍या प्रत्येक रस्त्यावर राजरोसपणे वाहन चालकांच्या खिशावर दरोडे टाकताना दिसत असतात. या कर्मचार्‍यांना याच वाहतूक शाखेतील बाबाचे आशीर्वाद असल्याचे लपून राहिलेले नाही.

जिल्हाधिकारी साहेब; तुम्हीच सांगा, बायपास रस्ता कशासाठी?
शहरातील अवजड वाहतुकीने होणारी वाहतूक कोंडी सुटावी, अपघात कमी व्हावेत यासह शहरातील अंतर्गत वाहतुकीला होणारा अडथळा कमी व्हावा यासाठी सरकारकडे पाठपुरावा करुन तत्कालीन खासदार दिलीप गांधी आणि त्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला. त्यातून हा बायपास रस्ता दुभाजकासह अत्यंत दर्जेदार झाला. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याने अवजडसह नगर शहराशी संबंधीत नसणारी सर्व प्रकारची वाहने जात- येत होती. मात्र, असे असताना गेल्या पंधरा दिवसात ही वाहने शहरातून कशी आणि कोणाच्या आशीर्वादाने सुरू झाली याचा शोध आता जिल्हाधिकार्‍यांनीच घेण्याची गरज आहे.

शहरात येणार्‍या रस्त्यांवरील चेकपॉईंट अन् पोलिस का हटवले?
पुणे, सोलापूर, विळद घाट, शेंडी (संभाजीनगर) या ठिकाणी वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांच्या ड्युट्या लावण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी ड्युटीवर असणारे कर्मचारी कोणतेही अवजड वाहन शहरात जाऊ देत नव्हते. त्यातून शहरातील वाहतूक कोंडीसह अपघाताचे प्रश्न देखील निकाली निघाले होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून या पॉईंटवरील पोलिस कर्मचारी हटविण्यात आले. हे कर्मचारी याआधी त्या पॉईंटवर का होते आणि आता हे कर्मचारी का हटविण्यात आले या प्रश्नाचे उत्तर नगरकरांना थेट पोलिस अधीक्षक यांच्याकडूनच मिळावे ही अपेक्षा आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम मामा लंके यांचे निधन

निघोज / नगर सह्याद्री : कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष...

‘लाडकी बहीण’वरून लाडक्या बहिणी भिडल्या; कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत...

लाच स्वीकारताना तलाठी अडकला जाळ्यात; नगरमध्ये कुठे घडला प्रकार पहा…

कोपरगाव | नगर सह्याद्री सदनिकेच्या खरेदीखताची नोंद सातबारा उतार्‍यावर करून देण्यासाठी साडेसहा हजार रुपयांची लाच...

चाईल्ड पोर्नोग्राफी व्हिडीओ व्हायरल करणे भोवले; काय घडलं पहा

चार इंस्टाग्रामधारकांवर गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे (चाईल्ड पोर्नोग्राफी) व्हिडीओ सोशल...