राहाता / नगर सह्याद्री –
Radhakrishn Vikhe Patil | Bachchu Kadu : महाराष्ट्रात महायुतीच्या लाटेत अनेक दिग्गज नेत्यांचे पराभव झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे, राजेश टोपे आदी नेत्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. या नेत्यांबरोबच अपक्ष आमदार असूनही राज्याच्या विधानसभेत ज्यांचा कायम दरारा असायचा त्या बच्चू कडू यांनाही धक्कादायरित्या पराभवाला सामोरे जावे लागले. बच्चू कडू यांनी चार वेळा अपक्ष म्हणून विधानसभेत पाऊल ठेवले होते. यंदा पाचव्यांदा आमदार होण्यास ते उत्सुक होते. परंतु भाजप उमेदवाराने त्यांना अस्मान दाखवले आहे.
दरम्यान, पराभवानंतर बच्चू कडू राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा बुलढाण्याच्या शेगावमध्ये मेळावा घेणार आहेत. ‘सत्ता की सत्तेच्या बाहेर, झेंडा की सेवा’ याचा निर्णय बच्चू कडू घेणार आहेत. त्याआधीच बच्चू कडू यांच्या नावाला विरोध केला जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्याने बच्चू कडू यांना महायुतीत घेऊ नये, अशी भूमिका मांडली आहे.
राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बच्चू कडू यांच्या नावाला विरोध केला आहे. बच्चू कडू यांना महायुती सरकारने पाठबळ दिलं. धोरण मान्य केली. दिव्यांगाची धोरण मान्य केली. त्याच्याशी प्रतारणा करून बच्चू कडू यांनी जो विश्वासघात दाखवला. त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सामिल करून घेण्याची आवश्यकता नाही. त्यांना घेऊ नये अशी आमची अपेक्षा आहे, विखे पाटील म्हणाले आहेत.