विधानसभा शिवसेनेचीच | भाजपाची ताकद नगरकरांना माहितीय | अभिषेक कळमकर, किरण काळेंची ताकद किती हे सर्वश्रूत!
अहमदनगर | नगर सह्याद्री
स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या विचाराने प्रेरीत झालेल्या नगरकरांमुळे नगर शहरात शिवसेनेची ताकद मोठी आहे. सर्वाधिक नगरसेवक आमचे आहेत. सेनेत फूट पडल्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक- दोन नगरसेवक वगळता कोणी गेले नाही. नगर शहरात लंके यांना किती मिळाली याहीपेक्षा विखे यांना मागील लोकसभा निवडणुकीत ५५ हजारांची जास्तीचे मते मिळाली होती आणि यावेळी ३२ हजार मते मिळाली आहेत. जवळपास २८ हजार मतांनी त्यांचे मताधिक्य कमी करण्यात आम्ही यशस्वी झालोत आणि हेच आमचे यश आहे. ही २८ हजार मते फक्त आणि फक्त आमची आहेत. अनिलभैय्यांना दगाफटका केल्याचा बदला आम्ही घेतला असल्याचा दावा करतानाच येणारी विधानसभा उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनाच लढणार आणि जिंकणार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी केला. आमच्या योगदानामुळेच विखे यांचे मताधिक्य नगरकरांनी रोखले. महाविकास आघाडीतील अभिषेक कळमकर, काँग्रेसचे किरण काळे यांची शहरात ताकद किती हे सर्वश्रूत असल्याचा टोलाही कदम यांनी लगावला.
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नगर शहरात लंके व विखे यांना किती मिळाली याची आकडेवारी बाहेर आली. या आकडेवर आणि विखे यांच्या मताधिक्यावर भाष्य करताना संभाजी कदम यांनी त्यांची भूमिका मांडली.
मागील वेळी आम्ही त्यांच्याबरोबर होतो. याशिवाय भाजपाही होतीच! यावेळी त्यांच्यासोबत भाजपा आणि जगताप होते. असे असतानाही विखे यांचे मताधिक्य आम्ही कमीच केले आहे. शहर हिंदुत्वादी आहे. अनिलभैय्यांचे काम आहे. त्यांचा विश्वासघात झाला होता. विखेंच्या प्रलोभनाला आम्ही बळू पडू असे सार्यांनाच वाटत होते. मात्र, आम्ही सामान्य उमेदवाराला ताकद देण्याचे काम केले आणि त्यांची संपूर्ण निवडणूक आम्ही हातात घेतली. त्यातूनच लंके यांना नगर शहरात मते मिळाली. ही मते किती याहीपेक्षा विखे यांचे मताधिक्य रोखतानाच त्यांना थेट ३२ हजारांवर आणण्याचे काम फक्त आणि फक्त शिवसैनिकांनी केले. त्यात अनिल भैय्या राठोड यांना विखे यांनी केलेला विश्वासघात हाच मुद्दा राहिला.
नगरकरांना तो भावला आणि त्याचे रुपांतर मतांमध्ये झाले. आता येणारी निवडणूक शिवसेना लढवणार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देतील तो उमेदवार आम्ही निवडून आणणार! भाजपाची या शहरात ताकद किती आहे हे अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यांनी या विषयात दावा न केलेलाच बरा! अभिषेक कळमकर, किरण काळे यांच्याबद्दल मी बोलण्यापेक्षा नगर शहरातील मतदार त्यांचा आवाका आणि कुवत जाणून आहेत. किरण काळे यांच्या सोबत त्यांच्या पक्षाचे नगरसेवक नाहीत. अभिषेककडे त्यांच्या पक्षाचा एकही नगरसेवक नाही. त्यामुळे शहराला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने शिवाय पर्याय नाही. आम्ही आमचे नगरसेवक महाविकास आघाडी म्हणून सक्रिय राहिले. सर्व प्रभागात आम्ही बैठका घेतल्या. सार्यांना आम्ही एकत्र केलेे आणि त्यातूनच नगरमधील नीलेश लंके यांचा आकडा वाढलाय! विखे यांचे मागील मताधिक्य यावेळी कमी करणे आणि शिवसेना संपली म्हणणार्यांची तोंडे बंद करणे हे काम आम्ही केले असल्याचा दावाही संभाजी कदम यांनी केला.
चार हजार मतांवरून ९०० मतांवर आणलेय!- कदम
स्व. अनिलभैय्या यांच्या आदेशानुसार आम्ही मागील वेळी काम केले आणि त्यावेळी याच सुजय विखे यांना माझ्या प्रभागात चार हजार मते जास्तीची दिली. यावेळी त्यांना ९०० मते जास्त पडली असली तरी ३१०० मते कमी केलीत, त्याचे काय असा सवालही संभाजी कदम यांनी उपस्थित केला. हिदुत्वाच्या विचारधारेची काही मते विखे यांना मिळाली असली तरी त्यात त्यांचे स्वत:चे आणि त्यांच्यासाठी परिश्रम घेतल्याचा दावा करणार्यांचे योगदान शुन्य असल्याचा टोलाही संभाजी कदम यांनी लगावला.
बोल्हेगावमध्ये विखेंच्या मताधिक्यात आमचेच योगदान- दत्ता सप्रे
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत नगरसेवक म्हणून निवडून आलो. मात्र, त्यांच्याकडून कोणताच न्याय मिळत नसल्याचे पाहून मुदत संपण्याआधी म्हणजेच सहा महिने आधी मी नगरसेवक पदाचा राजीनामा फेकला. सुजय विखे पाटील यांची भेट घेतली आणि माझ्या प्रभागात जवळपास सहा कोटी रुपयांची रस्त्यांची कामे करून घेतली. या कामांमुळेच बोल्हेगाव परिसरात सुजय विखे यांना मताधिक्य मिळाले असून त्याचे क्रेडीट कोणालाच जात नसल्याचा निर्वाळा या प्रभागातील माजी नगरसेवक दत्तापाटील सप्रे यांनी दिला आहे. शिवसेनेचा महापौर असताना कामे झाली नाही. मी नगरसेवक पदाचा राजीनामा फेकला. विखे पाटलांकडे मागणी करताच त्यांनी माझ्या प्रभागात सहा मंदिरांचे सभामंडप विखे पाटलांनी दिले. चार रस्ते दिले. गणेश चौक ते बोल्हेगाव, गणेश चौक ते आंबेडकर चौक, आंबेडकर चौक ते गांधी नगर अशी रस्त्यांची कामे दिली आणि ती विखे पाटलांमुळेच पूर्ण झाली. त्यातूनच आम्ही या भागातून त्यांना साडेसात हजारांचे मताधिक्य मिळवून दिले असून त्याचे क्रेडीट कोणीही घेण्याचा प्रयत्न करू नये.
नागापूरमधील मताधिक्यात आमचेही योगदान- अॅड. राजेश कातोरे
लोकसभेच्या निवडणुकीत नगर शहरातून मताधिक्य देताना उपनगरातील बोल्हेगाव- नागापूरमध्ये आम्ही देखील सुजय विखे पाटील यांच्यासाठी मोठे योगदान दिले असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक अॅड. राजेश कातोरे यांनी दिली. आम्ही विखे पाटलांच्यासोबतच राहिलो. विखे पाटील यांना मताधिक्य देण्यात आमचेही येथे योगदान राहिले असून यापुढेही आम्ही त्यांच्याच सोबत राहणार असल्याचे नगरसेवक अॅड. राजेश कातोरे यांनी म्हटले आहे.
धनशक्तीला नगरकरांनी नाकारले- योगीराज गाडे
कर्डिले- जगताप यांच्या विरोधात नगरकरांमध्ये मोठी लाट आजही कायम असल्याचे आणि त्याचा फायदा आम्हाला झाल्याचे आकडेवारी सांगत आहे. आमचे टार्गेट ९० हजार मतांचे टार्गेट आम्ही धरले होते. ग्रामीण भाग लंके यांना चांगला होता. मात्र, शहरी भागात विखे यांना मताधिक्य राहिले. या निवडणुकीत धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. गोविंदपुर्यासह मुकुंदनगर आमच्या विचारधारेशी राहिले. त्यांचे मागील निवडणुकीतील मताधिक्य कमी करण्यात आम्ही यशस्वी झालोत आणि आमच्या नगरसेवकांसह नेत्यांची एकजूट येत्या विधानसभा निवडणुकीत गुलाल घेऊन दिसेल असा निर्वाळा शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक योगीराज गाडे यांनी दिला.
सुजय विखे पाटील यांना मिळालेले मताधिक्य भाजपमुळेच: अॅड. अभय अगरकर
अहमदनगर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना नगर विधानसभा मतदारसंघातून ३२ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. विखे पाटील यांच्या विजयासाठी आणि नगर शहरातून मोठे मताधिक्य मिळावे यासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली. भाजपा-सेनने तब्बल २६ प्रचार फेर्या काढल्या. यावेळी सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. १२ चौक सभा घेतल्या. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पदाधिकारी यांच्यासमवेत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार्यांच्या बैठका घेतल्या, विविध समाजबांधवांसोबत बैठका घेतल्या. विखेपाटील यांच्यासाठी भाजपाचे सर्वच पदाधिकार्यांनी एकदिलाने काम केले असून भाजप पदाधिकार्यांमुळे विखे पाटलांना नगर शहरातून मताधिक्य मिळाले आहे. या मताधिक्क्याचे क्रेडीट कोणी घेऊ नये असे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी नगर सह्याद्रीशी बोलतांना सांगितले.