spot_img
अहमदनगरविजयराव मैदानात: जिंकण्यासाठी नव्हे पाडण्यासाठी; पण कोणाला?; कोणी दिली सुपारी..!

विजयराव मैदानात: जिंकण्यासाठी नव्हे पाडण्यासाठी; पण कोणाला?; कोणी दिली सुपारी..!

spot_img

बाजार समिती निवडणुकीत केलेली चूक विजय औटी यांना भोवली | रामदास भोसले हे पारनेरची शिवसेना संपविणारे संजय राऊत!
सारिपाट / शिवाजी शिर्के
पारनेर विधानसभा मतदारसंघात लढत किती रंगी आहे हा प्रश्न चर्चेत असला तरी या मतदारसंघात माजी आमदार विजय औटी यांची उमेदवारी स्वत:च्या विजयासाठी नक्कीच नाही! त्यांची उमेदवारी आहे ती कोणाला तरी पाडण्यासाठी! औटी यांना फार मते मिळतील अशी परिस्थिती अजिबातच नाही आणि ही परिस्थिती त्यांनी स्वत:च ओढवून घेतली आहे. दहा- पंधरा हजार मतांचे मालक राहिलेल्या औटी यांची किमान सत्तर टक्के मते ही ते उमेदवार नसते तर मविआचे उमेदवार काशिनाथ दाते यांच्या पारड्यात पडली असती. उर्वरीत तीस टक्के मतांमध्ये राणी लंके, विजू औटी हे आले असते. विरोधी मतांमध्ये फूट पाडून ती काशिनाथ दाते आणि विजय औटी यांच्यात विभागील जातील हा अंदाज चाणक्ष असणार्‍या निलेश लंके यांना आला नसेल हे म्हणणेच धाडसाचे ठरेल. माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्या मतांबाबतही तेच गणित असले तरी दोन्ही औटींपेक्षा माजी आमदार औटी यांच्याबाबत सार्‍यांनाच शंका येऊ लागल्या आहेत. कधीकाळी औटी यांच्या पोस्ट टाकण्यासाठी त्यांच्या समर्थकांमध्ये चढाओढ दिसायची! यावेळी ‘उमेदवारी करतोय’ अशी पोस्ट दस्तुरखुद्द विजय औटी यांना टाकावी लागली यातच सारे काही आले. त्यांच्या या पोस्टला तालुक्यातील एका हाताच्या बोटावर मोजण्याइतपत समर्थकांनी ‘लाईक’ केले आणि ‘फॉरवर्ड’ केले! आजपर्यंत एकही जाहीर सभा त्यांनी घेतल्याचे दिसून येत नाही. त्यांची उमेदवारी ही जिंकण्यासाठीच नक्कीच नाही. लंके विरोधी मते खाऊन, कोणाला तरी त्यांना पाडायचे आहे! कधीकाळी जिंकण्यासाठी लढणारे औटी साहेब यावेळी कोणालातरी पाडण्यासाठी उभे राहिलेत ही भावना आता मतदारसंघात वाढीस लागलीय! साहेब कितीही छान बोलत असले, त्यांची विषयाची मांडणी कितीही छान असली तरी त्यांनी घेतलेली ‘सुपारी’ लपून राहिलेली नाही. आता ही सुपारी कोणी दिली आणि कोणासाठी घेतलीय याचा शोध घेण्याचे काम मतदार करत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पारनेरमध्ये विद्यमान खासदार सन्माननीय निलेश लंके यांच्या सौभाग्यवती राणीताई लंके या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांची उमेदवारी लोकसभा निवडणुकीच्यावेळीच अंतिम झाली असल्याने त्यात नवीन काहीच नाही! मात्र, विरोधात कोण हे गेल्या पंधरा दिवसापर्यंत स्पष्टपणे समोर येत नव्हते. त्यामुळेच नीलेश लंके हेही शांत दिसून येत होते. महाविकास आघाडीने काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर केली आणि दुसर्‍या क्षणाला बंडाचे झेंडे हाती घेतले गेले. अजित पवार यांना भेटून कोणालाही उमेदवारी द्या अशी मागणी करणार्‍यांनीच बंड करत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे गेल्या आठ- दहा दिवसात चर्चा झडल्या आणि झडताहेत त्या बंडोबांबाबत आणि पाठींबा देणार्‍यांबाबत! या सार्‍या घटनाघडामोडीत पडद्याआड मोठी घडामोड घडली आणि तीन टर्म आमदार राहिलेल्या विजय औटी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. विजय औटी यांची तालुक्यातील आजची राजकीय ताकद किती याहीपेक्षा जी ताकद आहे ती विजय होण्याइतपत नसल्याचे कोणीतरी हेरले. ही ताकद मतविभागणीचा फायदा देणारी असल्याने त्यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून दुसर्‍या क्रमांकावर येणार्‍या उमेदवाराला पाडण्यासाठी औटी यांची मते निर्णायक होऊ शकतात याचा अंदाज आलेल्यांनी विजय औटी यांना हवा भरली! सारी रसद पुरवली! साहेबांशिवाय पर्याय नाही अशी स्क्रिप्त तयार करून दिली आणि साहेबांनीही आपण किती वैचारिक बोलू शकतो हे दाखवणार्‍या पोस्ट स्वत: सोशल मिडियावर टाकण्यास प्रारंभ केला. ‘इतका अभ्यासू आमदार याआधी कधीच झाला नाही आणि होणार नाही! साहेबांच्या काळात हे झाले, ते झाले आणि आज तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असताना पुन्हा साहेबांचीच गरज आहे’, असा आशय असणार्‍या पोस्टही त्याखाली काही खर्‍याखुर्‍या समर्थकांनी तर काही पेड समर्थकांनी टाकल्या! उमेदवारी कशासाठी आहे याची माहिती फक्त विजय औटी आणि त्यांच्या परमशिष्याला आहे.

पराभूत होऊनही सत्ता आली असताना शिवसैनिकांना वार्‍यावर सोडणारे हेच ते विजय औटी!
पाच वर्षापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत निलेश लंके यांच्याकडून कार्यसम्राट ओळख असणारे विजय औटी ६५ हजारांनी साहेबांना पराभूत झाले. यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. ठाकरे मुख्यमंत्री झाले असतानाही सलग दोन- अडीच वर्षे घरात कोंडून घेतल्यागत विजयराव बसून राहिले. या कालावधीत शिवसैनिकांवर हल्ले झाले, त्यांची अडवणूक झाली. प्रशासन दावणीला बांधल्यागत औटी समर्थकांना टार्गेट करत राहिले. अनेकांवर गुन्हे दाखल झाले. औटी यांचा नेता अडीच वर्षे मुख्यमंत्री आणि त्या अडीच वर्षात विजय औटी कुठे तर, फार्म हाऊसवर!

नगरपंचायतीत बायकोला निवडून आणू न शकणारे हेच ते विजय औटी!
विधानसभेत पराभूत झाल्यानंतर विजय औटी यांच्या विषयी पारनेर शहरात चांगली सहानुभूती होती. त्यात जयश्री औटी यांचा मोलाचा वाटा! पारनेर नगर पंचायत निवडणुकीत जयश्री औटी यांना उमेदवारी देण्याची गरजच नव्हती! मात्र, सोबतच्या रात्रीच्या बैठकीतील सल्लागारांच्या आहारी जात त्यांनी निर्णय घेतला. त्यातील काही लंके यांच्या संपर्कातील होतेच! अत्यंत धूर्त चाल खेळत नवख्या तरुण मुलीकडून जयश्री औटी यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत करण्यात लंके यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. नगरपंचायतीच्या निवडणुकीत स्वत:ची सौभाग्यवती पराभूत झाल्यानंतरही त्यांचे विमान जमिनीवर लँड झालेच नाही. यानंतर संघटन वाढविण्याचे काम सोडून औटी पुन्हा रामदास भोसले यांच्या सल्ल्याने विजनवासात!

बाजार समितीतील सलगी विजय औटी यांना भोवली!
बाजार समिती ही सहकारातील निवडणूक! त्यानिमित्ताने तालुक्यातील शिवसेेना पदाधिकारी गावागावातील सरपंच- चेअरमन ही समर्थक मंडळी वेगळी भूमिका घ्या असे सांगत असताना विजय औटी यांनी हुकुमशहा प्रमाणे कोणालाही विश्वासात न घेता नीलेश लंके यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. काशिनाथ दाते, गणेश शेळके, बाबासाहेब तांबे यांच्यासह अनेकांची भूमिका विखे यांच्यासोबत जाण्याची असताना त्यांनी रामदास भोसले यांचा सल्ला ऐकला आणि लंके यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. लागलीच लंके- औटी यांची पत्रकार परिषद! नीलेश लंके यांच्यावर स्तुतीस्तुमने उधाळताना लंके किती चांगले आणि त्यांचे काम किती चांगले यावर ते दहा मिनीटे स्थानिक माध्यमांसमोर बोलले! लंके यांच्यासोबत जाण्याचा निर्णय एकट्या विजय औटींचा! शिवसैनिक आणि नीलेश लंके यांच्यातून त्यावेळी विस्तव जात नव्हता. यानिमित्ताने शिवसैनिकांशी थेट बैठका करण्याची संधी लंके यांना मिळाली. गावागावात विजय औटी – निलेश लंके यांच्या त्यावेळी बैठका झाल्या. त्यातून औटी यांच्यासोबत असणारे जवळपास ७० टक्के पदाधिकारी- शिवसैनिक लंके यांच्या गळाला लागले. बाजार समिती जिंकल्यापेक्षाही नीलेश लंके यांना विजय औटी यांच्या गोटात घुसून त्यांचे जवळपास ७० टक्के समर्थक गळाला लावले याचा आनंद सर्वाधिक झाला.

खरेदी- विक्री संघाच्या निमित्ताने शिवसैनिकांनी औटींना जाणिव करून दिली!
बाजार समिती पाठोपाठ खरेदी विक्री संघाची निवडणूक झाली. ही निवडणूक आपण सहज जिंकू असे करंदीच्या फार्महाऊसवर ‘बैठकीत’ बसून रामदास भोसले सांगत राहिले! लंके हेही फाजिल आत्मविश्वासात राहिले. लंके- औटी एकत्र आले. अनेकांना ते पुन्हा खटकले! त्यातून औटी समर्थकांनी विखे यांना साथ दिली आणि पूर्णपणे एकहाती सत्ता विखे यांच्या ताब्यात आली. तुमचे हुकुमशाही निर्णय आम्हाला मान्य नसल्याचेच खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत मतदारांनी विजय औटी यांना अप्रत्यक्षपणे मतदानातून सांगितले. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

लोकसभा निवडणुकीत मविआ विरोधी भूमिका घेत औटींनी राजकीय आत्महत्याच केली!
लोकसभा निवडणूक जाहीर होताच विजय औटी यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत लंके यांना साथ देण्याची गरज होती. आजारी असल्याचे सांगत ते घरात बसून राहिले. आठ दिवसांवर मतदान आले असताना त्यांनी विखे यांना पाठींबा जाहीर केला. लागलीच त्यांची शिवसेना नेतृत्वाने हकालपट्टी केली. विखेंना पाठींबा दिल्यानंतर हे विजय औटी कोणत्याही गावात गेले नाही आणि विखे यांना मतदान करा असे त्यांनी सांगितले नाही. कोणतीच बैठक नाही, पदाधिकार्‍यांना सांगावा न देता विखे यांना पाठींबा देऊन औटी यांनी स्वत:चे ‘टेंडर’ भरुन घेतल्याची जाहीर चर्चा झडली. औटी यांनी विखेंसाठी काहीच जाहीर भूमिका घेतली नाही. मग, पाठींबा कशासाठी जाहीर केला या प्रश्नाचे उत्तर कोणालाच मिळाले नाही. त्यांचा तो निर्णय म्हणजे त्यांची राजकीय आत्महत्याच ठरली.

पाच वर्षात पारनेरमध्ये दहशत माजल्याचे दु:ख बोलून आज काय उपयोग?
सुशिक्षीत मतदारांचा तालुका, सेनापती बापट- अण्णासाहेब हजारेंचा तालुका, वैचारीक बैठक असणारा तालुका, स्वाभिमान गहान न ठेवणारा तालुका, चांगल्याला चांगले अन् वाईटाला वाईट म्हणणारा तालुका, राज्यात वेगळी ओळख असणारा तालुका, हुजरेगिरीला जुगारणारा तालुका, कोणाच्याही दबावाला बळी न पडणारा तालुका, क्रांतीकारी विचारांचा तालुका, शिक्षकांचा तालुका, मायानगरी मुंबईत पारनेरकर ही वेगळी ओळख निर्माण केलेला पारनेर तालुका, वाहतूक व्यवसाय आणि मच्छिमार्केटमध्ये मुंबईत वेगळे अस्तित्व निर्माण करणारा पारनेरकर, पतसंस्था चळवळीत अग्रेसर अशी ओळख असणारा तालुका! जापनीज उद्योग असणार्‍या एमआयडीसीचा तालुका! अशी आगळीवेगळी ओळख निर्माण असणार्‍या तालुक्याची ओळख पाच वर्षात बदलली! लाठ्याकाठ्या अन् शस्त्रांचा वापर करत दहशत पसरवणार्‍यांचा तालुका, दहशत- गुंडागिरी वाढली! तालुक्याच्या संस्कृतीला छेद देण्याचे काम पाच वर्षात झाले. राज्यात पारनेरची तशी चांगल्या अर्थाने ओळख असली तरी त्यात अलिकडच्या काळात ही ओळख राहिली आहे का असा प्रश्न दस्तुरखुद्द माजी आमदार विजय औटी यांनी उपस्थित केलाय! मात्र, असे असले तरी गेल्या अडीच वर्षात त्यात त्यांचाही काही वाटा आहे! अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो! विजय औटी हे जबाबदार लोकप्रतिनिधी राहिलेत! त्यांनी वाढलेल्या गुन्हेगारीच्या विरोधात पाच वर्षात कितीवेळा आवाज उठवला? स्वत:च्या जवळच्या कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यात डांबले असताना, ‘मी काहीच करु शकत नाही’, असे उत्तर देणारे हेच ते विजय औटी!

(पूर्वार्ध)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्ह्यात महायुतीला सर्वाधिक जागा! दोन अपक्ष बाजी मारणार

महायुती 7, मविआ 3 तर 2 अपक्ष बाजी मारणार! नगर शहरात कमालीची उत्सुकता | श्रीगोंदा,...

शिरसाटवाडी मतदान केंद्रावर काय घडलं?; काय म्हणाल्या आमदार मोनिकाताईं राजळे? वाचा सविस्तर..

पाथर्डी | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडली. आररोप प्रत्यारोप, कुठे पैशाचे...

अदानी अडचणीत; अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल; काय आहे नेमके प्रकरण?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे....

CM पदाबाबत संजय राऊत यांचे मोठे विधान; थेट तारीख आणि वेळच सांगून टाकली

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : विधानसभा निडवणुकीच्या मतदानानंतर बुधवारी समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या...