निघोज । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यातील जवळे मार्गे शिरूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जातीचे वासरे घेऊन जाणारा टेम्पो ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पकडला गेला. टेम्पो मधून गोवंशीय जातीच्या ४० वासरांची सुटका करण्यात आली. आक्रमक ग्रामस्थांना पहाताच टेम्पो चालकाने धूम ठोकली.
गुणोरे येथील दोघेजण दुचाकी वरून शिरूर कडे जात असताना जवळे येथील कुकडी वसाहत शेजारी सदर टेम्पोची दुचाकीस्वरांना धडक बसली. यावेळी टेम्पो चालक आणि दुचाकीस्वरांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमली. यावेळी टेम्पोत कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने ४० गोवंशीय जातीचे वासरे आढळले.
ग्रामस्थांनी चालकाकडे चौकशी केली असता चालकाने धूम ठोकली. घटनेची माहिती मिळताच पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक नितीन खंडागळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गोवंशीय जातीच्या ४० वासरांसह टेम्पो ताब्यात घेतला असून टेम्पो चालक विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली. तसेच गोवंशीय जातीचे वासरे गो शाळेत देणार असल्याची त्यांनी सांगितले.
शाब्दिक चकमक
गुणोरे ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलीसांना दिली. तसेच याप्रकरणी पोलिसांनी फिर्याद दाखल करावी अशी मागणी केली. परंतु पोलीसांनी ग्रामस्थांनी मागणी फेटाळली. यावेळी गणेश महाराज शिंदे यांनी हस्तक्षेप करीत फिर्यादी तुम्ही व्हा अडचण काय आहे? असा प्रश्न केला यावर ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक पहायला मिळाली.