खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आणि विशेषतः अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील प्रवाशांच्या सोयीसाठी आता नागपूर ते पुणे हे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखविला आहे. या गाडीला अहिल्यानगर येथे अधिकृत थांबा देण्यात आला असून जिल्ह्यातील प्रवाशांना आता जलद, आरामदायक आणि उच्च दर्जाच्या प्रवासाची सुविधा मिळणार असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.
पुणे येथे 23 जुलै रोजी पार पडलेल्या रेल्वे सल्लागार मंडळाच्या बैठकीत अहिल्यानगर स्थानकावर विविध गाड्यांना थांबा देण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली होती. त्याची दखल घेऊन वंदे भारत एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे. 10 ऑगस्ट रोजी नागपूरहून या रेल्वेसेवेला सुरूवात होणार असून अजनी, नागपूर येथून सोमवार वगळता आठवडयातून 6 दिवस ही गाडी पुण्याकडे प्रस्थान करणार आहे तर पुण्याहून मंगळवार वगळता आठवडयातून 6 दिवस ही गाडी अजनी, नागपूरकडे प्रस्थान करणार आहे.
अजनी, नागपूरहून पुण्याकडे जाताना या गाडीचे अहिल्यानगर स्थानकावर सायंकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी आगमन होईल व 7 वाजून 37 मिनिटांनी पुण्याकडे प्रस्थान होईल. पुण्यहून अजनीकडे प्रस्थान करताना अहिल्यानगर स्थानकावर ही गाडी सकाळी 8 वाजून 33 मिनिटांनी पोहचेल व 8 वाजून 35 मिनिटांनी अजनी, नागपूरकडे प्रस्थान करेल. अजनी, नागपूर स्थानकावरून ही एक्सप्रेस सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी सुटेल तर पुण्याहून सकाळी 6 वाजून
25 मिनिटांनी नागपूरसाठी सुटणार आहे.
सकारात्मक बदल होईल
वंदे भारतसारखी उच्च दर्जाची सेवा जिल्ह्याला मिळणे ही ऐतिहासिक बाब आहे. रोजगार, शिक्षण, व्यापार,आरोग्य आणि संपर्क यामध्ये मोठया प्रमाणावर सकारात्मक बदल होईल. नागपूर आणि पुणे या दोन महत्वाच्या शहरांशी जिल्ह्याचा थेट संपर्क सुलभ होईल.
– खासदार नीलेश लंके