पुणे / नगर सह्याद्री –
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून वारंवार होणारा मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून वैष्णवीने १६ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वैष्णवीच्या आई-वडिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणदेला अटक केली आहे. तर तिचे सासरे आणि दीर फरार आहेत. या दोघांचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. वैष्णवीची जावबाई मयुरी जगतापने या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया देली. हगवणेंच्या मोठ्या सूनेने कुटुंबाच्या काळ्या कारनाम्याचा पडदा फाडला आहे.
मयुरी जगताप ही राजेंद्र हगवणे यांची मोठी सून आहे. राजेंद्र हगवणेच्या कुटुंबाने मयुरीला देखील वैष्णवीप्रमाणेच त्रास दिला. तिचा देखील वारंवार छळ आणि मारहाण ते करत होते. या छळाला कंटाळून मयुरीने घर सोडले आणि ती आता माहेरी राहते. मयुरीला तिची सासू, नणंद आणि दीर म्हणजेच वैष्णवीचा नवरा देखील मारहाण करत होता. तिला तिच्या नवऱ्याने साथ दिली. माझ्या नवऱ्याने मला साथ दिली नाही तर आज वैष्णवीच्या जागी मी असते असे वक्तव्य मयुरीने केले आहे.
मयुरी जगतापने आपल्या सासरच्या लोकांवर अनेक गंभीर आरोप केले आहे. तिने सांगितले की, ‘२०२२ मध्ये माझं सुशीलसोबत लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर सुरूवातीला माझ्या सासरची लोकं माझ्याशी चांगले वागले पण नंतर त्यांनी मला त्रास द्यायाल सुरूवात केली. माझा दीर, नणंद, सासू सतत माझा छळ करत होते आणि मारहाण करत होते. माझी नणंद करिश्मा माझ्याशी सतत भांडायची. मला वैष्णवीसोबत कधीच बोलून दिलं नाही. वैष्णवीचा नवरा देखील मला मारायचा. माझा नवरा बाहेर गेल्यावर मला ते मारहाण करायचे.
मी प्रत्युत्तर देणं हे त्यांच्यानुसार चुकीचे होते. त्यामुळे ते मलाही मारहाण करायचे. चुकीच्या गोष्टाला मी विरोध करते म्हणून ते मारहाण करत होते. मुलीचं ऐकून सासू मला त्रास देत होती. माझ्या नवऱ्याला मी सांगायचे तेव्हा आम्ही वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. वेगळं राहत होते तरी देखील ते त्रास देत होते. माझ्या नवऱ्याने मला साथ दिली. त्याने नेहमी मला पाठिंबा दिला. हे पाहून माझे सासरचे त्याला देखील त्रास देत होते. त्यांच्या मुलालाही त्यांनी सोडलं नाही. ते माझी बाजू घ्यायचे म्हणून त्यांनाही ते मारहाण करायचे. तो ढसाढसा रडायचा. माझा नवरा खूप चांगला होता. ही लोकं सुधारणार नाहीत त्यामुळे त्याने मला तू तुझ्या घरी जा असे सांगितले. नाहीतर आज वैष्णवीच्या जागी मी स्वत: असते.
‘वैष्णवीला तिच्या नवऱ्याची कधी साथ मिळाली नाही. वैष्णवीचा नवरा शशांक मला देखील मारायचा. घरातच एका वेगळ्या खोलीत मी माझा संसार थाटला होता. आम्ही वेगळे राहायचो तर सासरची लोकांनी लाईट कापाली, पाणी बंद केलं, लादी पुसायला बाई येऊन देत नव्हते. गावात कुणालाही माझ्याशी बोलून द्यायचे नाहीत. माझी नणंद मला जेवण देत नव्हती. जेवणासाठी खूप हालहाल केले आणि शारीरिक त्रास दिला. त्यानंतर आम्ही घर सोडून दुसरीकडे भाड्याने राहायला जाण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला कुठे रूम देखील मिळवून देत नव्हते.’
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात काय काय घडलं?
हुंड्यासारखी कुप्रथा आजही आपल्या समाजात आहे. त्यातून जाणारे बळी हे अद्यापही थांबत नाहीत ही बाब खरोखरच चिंताजनक आहे. याचं नुकतंच घडलेलं उदाहरण म्हणजे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण. १६ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने १६ मे रोजी आत्महत्या केली. यामागे हुंड्यासाठीचा छळ, कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप आहेत.
१६ मे २०२५ ला काय घडलं?
पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे २०२५ रोजी वैष्णवी शशांक हगवणे या २३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या वेळी ५१ तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या. पण नंतरही वैष्णवीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली आणि तिला घरातूनही बाहेर काढण्यात आलं होतं. वारंवार होणारा छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली.
वैष्णवीच्या वडिलांनी काय सांगितलं?
वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा नवरा शशांक आणि सासरे राजेंद्र हगवणे यांनी आर्थिक कारणांमुळे तिला मारहाण केली. एकदा तिच्या वडिलांनी विचारले, “वैष्णवीच्या अंगावर इतक्या जखमा कशा?” यावर राजेंद्र आणि शशांक म्हणाले, “आधीच सांगितलं होतं, आम्हाला पैसे पाहिजेत. तुझ्या पोरीला आम्ही काय फुकट नांदवायचं? म्हणूनच तिला मारून टाकलं.” जावयाचे हे शब्द वडिलांचं काळीज चिरत गेले. सासरच्यांकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह
वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नाला वैष्णवीच्या घरातल्यांचा विरोध होता. तो विरोध पत्करुन वैष्णवीने लग्नाचा निर्णय घेतला. ज्यानंतर तिच्या घरातल्यांनी थाटात तिचं लग्न करुन दिलं होतं. मात्र शशांक वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. वैष्णवीच्या वडिलांनी २०२३ मध्ये मुलगी वैष्णवी गरोदर असताना शशांकने तिच्यावर संशय घेतल्याचं म्हटलं होतं. पोलीस तक्रारही केली होती.
२०२३ च्या एफआयआरमध्ये काय म्हटलं आहे?
वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांची मुलगी वैष्णवी ही गरोदर असताना, तिने ही आनंदाची बातमी आपला पती शशांक यास सांगितली. मात्र शशांकने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला, हे मूल माझं नाही असं शशांक तिला म्हणाला. तिच्या सासरच्या लोकांनी तिचा छळ केला, शशांकने वैष्णवीसह भांडण करून तिला मारहाण केली. तिला घरातून हाकलून दिले. त्यानंतर वैष्णवी माझ्या घरी आली आणि तिने घडला प्रकार मला सांगितला. सासरच्यांकडून होणारा मानसिक त्रास सहन न झाल्यानं तिने २७ नोव्हेंबर २०२३ रोजी विषारी औषध जेवणातून घेतलं. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली, आम्ही तिला एम्स रुग्णालयात दाखल केलं. तिथे तिच्यावर चार दिवस उपचार सुरू होते. मात्र तिच्या सासरहून कोणीही तिची विचारपूस करण्यासाठी तिथे आलं नाही.ती पूर्ण बरी झाल्यानंतर काही दिवस आमच्याच घरी होती. आम्ही तिला पुन्हा तिच्या सासरी घेऊन गेलो. मात्र तिचा छळ सुरूच होता. त्यानंतर साधारणपणे १५ दिवसानंतर माझे जावई शशांक हे माझ्या राहत्या घरी आले व त्यांनी माझ्याकडे जमीन घेण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली, असं वैष्णवीच्या वडिलांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
वैष्णवी आणि शशांकच्या लग्नाच्यावेळची बैठक आणि भांडण काय?
वैष्णवीच्या लग्नाला तिच्या घरातल्यांनी म्हणजेच कस्पटे कुटुंबाने विरोध दर्शवला होता. मात्र वैष्णवीला शशांकशीच लग्न करायचं होतं अशी माहिती तिच्या मामाने एका वृत्तवाहिनीला दिली. तसंच आम्ही तिच्या वडिलांची समजूत घातल्यावर वैष्णवी आणि शशांक यांचा विवाह थाटात लावून देण्यात आला. ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी असं सगळं आम्ही दिलं होतं. मात्र हगवणे कुटुंबाची हाव काही संपली नाही. त्यांनी हुंडा, पैसे यासाठी वैष्णवीला मारहाण केली. तिचा छळ हुंड्यासाठीच केला जात होता असं वैष्णवीच्या मामाने म्हटलं आहे. तसंच बैठकीच्या वेळी झालेला वादही वैष्णवीच्या मामाने सांगितला. बैठकीच्या वेळी जेव्हा मागण्या होऊ लागल्या तेव्हा वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे म्हणाले मला तुम्हाला मुलगी द्यायची नाही. तरीही हगवणे कुटुंबाने भांडून मोठी गाडी घेतली. त्यांच्यासाठी आम्ही MG हेक्टर गाडी बुक केली होती. ती गाडी रद्द करा आणि फॉर्च्युनर द्या अशी मागणी केली. सोन्याची मागणीही अशीच वादातूनच झाली. १ लाख २० हजारांचं घड्याळही हगवणे कुटुंबाने मागून घेतलं. सहा महिन्यांनी अशाच गोष्टी समोर येऊ लागल्या. वैष्णवीला मी विचारलं की हा काय प्रकार आहे? त्यावर ती मला म्ङणाली मामा माझी चूक झाली. अर्थातच वैष्णवीला तिच्या निर्णयाचा पश्चाताप होत होता असं तिच्या मामाने टीव्ही ९ मराठीला सांगितलं.
वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात काय समोर आलं?
वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या असून, तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वैष्णवीच्या वडिलांनी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे. वैष्णवीची सासू लता हगवणे, नवरा शशांक आणि नणंद करिष्मा हगवणे अटकेत आहेत.
महिला आयोगाने घेतली प्रकरणाची दखल
दरम्यान या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वैष्णवी हगवणे या विवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेची दिनांक १९ मे २०२५ रोजी स्वाधिकारे दखल घेतली असून राज्य महिला आयोगाने पुणे पोलिसांना याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.