श्रीरामपूर । नगर सहयाद्री:-
पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिक असणारे नितीन दिनकर यांची उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात तीन जिल्हाध्यक्ष आहेत. अहिल्यानगर शहराचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग व उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे हे होते. मात्र त्यांनी विधानसभा निवडणूक लढवत नेवासा मतदार संघात विजय मिळवला. आता त्यांच्या जागी नितीन दिनकर यांची निवड करण्यात आली आहे.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणारे सर्वसामान्य कुटुंबातील नितीन दिनकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता ते भाजपचे जिल्हा चिटणीस, शिर्डी लोकसभा मतदार संघाचे बुथ प्रमुख,भाजप महाराष्ट्र प्रवक्ते अशा पक्षानी दिलेल्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. भारतीय जनता पार्टीने संभाव्य नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समित्या निवडणुकांत पक्षाला उभारी आणत जिल्हा भाजपमय करण्याच्या अनुषंगाने हे टाकलेले पाऊल मानले जात आहे.
भाजपचे नितीन दिनकर यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्याशी देखील घनिष्ठ संबंध आहेत. ते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. श्रीरामपूर मतदारसंघात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून व नितीन दिनकर यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण भागातील अनके विकासकामे देखील पार पडली आहेत. भाजप उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांचे निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठल लंघे यांनी अभिनंदन केले आहे.