अहिल्यानगर । नगर सहयाद्री :-
नगर अर्बन बँकेचे चार्टर्ड अकौंटंट विजय मर्दा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा न्यायाधीश एम. एच. शेख यांनी नामंजूर केला आहे. मूळ फिर्यादी यांच्यावतीने काम पाहणारे अॅड. अभिजीत पुष्पाल यांनी नगर अर्बन बँक घोटाळ्यातील सीए मर्दाचा सहभाग पुराव्यानिशी न्यायालयासमोर मांडल्याने न्यायालयाने मर्दाचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज नामंजूर केला आहे.
नगर अर्बन बँकेत आर्थिक घोटाळा झाला आहे. सुमारे २९१ कोटी रुपयांचा हा घोटाळा असून या संदर्भामध्ये तीन ठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आजी-माजी संचालकांवर गुन्हे दाखल आहेत. काही जणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे तर काहींना जामीन सुध्दा मिळालेला आहे.
मर्दा यानेही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर नुकतीच सुनावणी झाली. मूळ फिर्यादी च ठेवीदार यांच्यावतीने अॅड. अभिजीत पुप्पाल यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. अर्बन बँकेत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला आहे. बँकेच्या घोटाळ्यांसंदर्भात रिझर्व्ह बैंक ऑफ इंडियाने वेळोवेळी बँकेला लेखी पत्राद्वारे आदेश दिलेले असताना त्याचे पालन झालेले नाही.
रिझर्व्ह बँकेने त्यावेळी ४० लाखांचा दंडही केला होता. बँकेच्या ऑडिटमध्ये अनेक चुकीच्या बाबी उघड झालेल्या होत्या. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे, ही बाच अॅड. पुष्पाल यांनी युक्तिवादामध्ये प्रभावीपणे मांडली. मर्दाच्यावतीने न्यायालयात बाजू मांडण्यात आली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तियाद ऐकल्यानंतर मर्दाचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे.