अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्या प्रकरणी बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एच. शेख यांनी नामंजूर केला आहे. राजेंद्र गांधी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल आहे.
28 कर्ज प्रकरणांतून बँकेची 150 कोटींची फसवणूक झाल्याची ही फिर्याद होती. पोलिसांनी त्यानंतर बँकेच्या सर्वच कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडीट केले. त्यातून आता 65 प्रकरणांतून 291 कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, अटकेच्या भितीपोटी अनेकांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. माजी चेअरमन राजेंद्र अग्रवाल यांनी देखील अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला हेाता. याबाबत फिर्यादी राजेंद्र गांधी यांच्यावतीने अॅड. अभिजित पुप्पाल यांनी बाजू मांडताना अर्बन बँकेत मोठा गैरव्यवहार झाला आहे. 291 कोटी रूपयांचे बोगस कर्ज वाटप झाले आहे.
अग्रवाल यांच्या मुलाने पोलिसांचा अहवाल सोशल मीडियावर व्हायरल केला होता, ही बाब गंभीर असून त्यांना जामीन देवू नये, असा युक्तीवाद करून जामीन देण्यास विरोध केला. अग्रवाल यांच्यावतीने देखील युक्तीवाद करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा व्यक्तीवाद ऐकल्यानंतर अग्रवाल यांचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे.