अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अवसायनात निघालेल्या नगर अर्बन बँकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी अशा एकूण 261 जणांना 3 मार्चपासून सेवासमाप्तीची, एक महिना पूर्वमुदतीची नोटीस अवसायक तथा केंद्रीय सहकार विभागाचे उपसंचालक गणेश गायकवाड यांनी बजावली आहे. केंद्रीय सहकार निबंधक व भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बँकेच्या सर्व कर्मचार्यांना ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान बँक अवसायनात काढण्यासाठी लागणार्या उर्वरित कामकाजासाठी कर्मचार्यांची कंत्राटी पध्दतीने भरती प्रक्रिया सोमवारपासून राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रचंड प्रमाणात थकलेली कर्ज व गैरव्यवहार या कारणातून अर्बन बँकेवर सुरूवातीला भारतीय रिझर्व बँकेने निर्बंध आणले होते. त्यानंतर कारभारात सुधारणा न झाल्याने संचालक मंडळाचे अधिकार गोठवण्यात आले होते.
त्यानंतर 4 ऑक्टोबर 2023 रोजी बँक अवसायनात काढण्यात आल्याचे आदेश देण्यात आले. बँकेवर अवसायकांची नियुक्ती झाल्यानंतर गेल्या सव्वा वर्षात सुमारे 56 कोटी रुपयांचे थकीत कर्ज वसूल करण्यात आले. प्रथम ठेवीदारांची देणी क्रमप्राप्त असून, त्यानंतर कर्मचार्यांना काही नुकसान भरपाई देता येईल का? याचा विचार केला जाईल, असे अवसायक गायकवाड यांनी सांगितले.
बँकेच्या खर्चात कपात करण्यासाठी यापूर्वी 21 शाखा बंद करण्यात आल्या आहेत. बँकेला सध्या कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नाही. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या सुचनेनुसार सर्व अधिकारी व कर्मचार्यांना एक महिना पूर्वमुदतीची नोटीस बजावण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
आता थकीत कर्ज वसूल करणे, न्यायालयीन कामकाज, केंद्र सरकारशी पत्रव्यवहार, व्यवस्थापन या कामांसाठी काही कर्मचार्यांची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी कंत्राटी पध्दतीने कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. कंत्राटी कर्मचारी भरतीसाठी बँकेच्या माजी कर्मचार्यांना प्राधान्य दिले जाईल, असे अवसायक गायकवाड यांनी सांगितले.