मुंबई । नगर सहयाद्री
पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही कारवाई केली. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विधानाचा मुद्दा नाना पटोलेंनी विधानसभेत उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकर्यांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोलेंवर निलंबनाची कारवाई केली.
विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर दुसर्या विषयाचे काम सुरू झाले असताना नाना पटोले यांनी बबनराव लोणीकर आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकर्यांबद्दल केलेल्या विधानांबद्दल संताप व्यक्त केला. मोदी तुमचे बाप असतील, राज्यातील शेतकर्यांचे नव्हे, असे म्हणत पटोले सभागृहात संतापले. माणिकराव कोकाटे आणि बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विधानांबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकर्यांची माफी मागावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली. त्यावरून प्रचंड गदारोळ सभागृहात झाला. त्यामुळे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.
कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांची माफी मागावी अशी मागणी लावून धरली. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे त्यांच्या आसनावरून उठून विधानसभा अध्यक्षांच्या आसनापर्यंत गेले. नाना पटोलेंनी राजदंडालाही हात लावला. अध्यक्षांच्या समोर उभे राहून माफीची मागणी केली. त्यानंतर सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि सत्ताधारी मंत्री, आमदार आक्रमक झाले.
विधानसभा अध्यक्ष राहिलेल्या माणसाने विधानसभा अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणे बरोबर नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. विरोधकांचा गोंधळ वाढल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित केले. मात्र, विरोधी पक्षातील आमदार माफी मागण्याच्या मुद्द्यावर आक्रमक झाले. घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळ गोंधळ सुरू होता. त्यानंतर विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला.