Weather Update: एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह देशात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यावर पुन्हा ‘अवकाळी’ पावसाचे ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभगाच्या माहितीनुसार, राज्यासह देशात एकीकडे पावसाची रिपरिम सुरु असताना दुसरीकडे काही भागात तापमानात वाढ झाली आहे. देशाच्या काही भागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. त्यातच महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह कोकणात अचानक पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
देशातील हवामानात वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे बदल पाहायला मिळत असल्यामुळे देशात पुढील 24 तासांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने येण्याची शक्यता आहे.