मुंबई / नगर सह्याद्री :
राज्यात पुन्हा पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट दूर झालेले नाही. आजही मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यावर असलेले अवकाळीचे संकट कायम आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आजही राज्यावर अवकाळीचे संकट कायम आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात आज वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरीत राज्यात ढगाळ वातावरणासह उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. अवकाळी पावसाचे संकट लक्षात घेता नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि सतर्कता बाळगावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात येत आहे.
आज मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यावर अवकाळीचे संकट आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड याजिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याकडून या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
तसंच, सिंधुदुर्ग आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामान राहिल. तर काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, रविवारी चंद्रपूरमध्ये ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. चंद्रपूरमध्ये रविवारी देशातील सर्वात उच्चांकी तापमान होते. त्यापाठोपाठ संभाजीनगर, नागपूर आणि वाशिममध्ये ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.