अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
मागील आठ दिवसांपासून शहरासह जिल्हाभरात ढगाळ वातावरण पसरले होते. रविवारी सायंकाळी ढगफुटीसदृश अवकाळी पाऊसाने जोरदार हजेरी लावली. कोसळलेल्या दमदार पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. तसेच शेतीचे देखील मोठे नुकसान झाले असून नागरिकांनी तातडीच्या पंचनाम्याची मागणी केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह आलेल्या अवकाळी पावसाने शहरासह ग्रामीण भागात हाहाकार माजवला.नगर शहरात जोरदार वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने रस्त्यांवर पाणी साचले, घरांमध्ये पाणी शिरले होते. आशा टॉकीज चौक, चितळे रोड, वाडिया पार्क आणि कोठी परिसरात रस्त्यांवर पाणी तुंबले, तर काही घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. सध्या शहरात रस्ते आणि ड्रेनेज लाईनची कामे सुरू असल्याने पावसामुळे रस्त्यांवर चिखल झाला, ज्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची गैरसोय झाली होती.
नगर तालुक्यात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर कृषी पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मोठा फटका बसला आहे. ३५ गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले असून, शेतीच्या कामांमध्ये असलेल्या अडचणी वाढल्या आहेत. आंबा, डाळिंब, मोसंबी, संत्रा, चिकू, लिंब आणि केळी यासारख्या फळांच्या बागांवर मोठा परिणाम झाला आहे.
याशिवाय पारनेर तालुक्यात आठ दिवसात कोसळल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. तिखोल, काकडेवाडी, हिवरे कोरडा, म्हसणे फाटा, ढवळपुरी, वडनेर, राळेगणसिद्धी, पानोली, वनकुटे, वासुंदे, टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, सावरगाव, मांडओहळ या भागांतील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना विशेषतः मोठा फटका बसला. याशिवाय कांदा, वाटाणा, फ्लॉवर, कोबी, मिरची यांसारख्या भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे. मका, कांदा, टोमॅटो, उन्हाळी बाजरी आणि मिरची पिकांचीही मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
राज्यात 10 दिवस जोरदार पाऊस
हवामान विभागाने राज्याच्या विविध भागात मे महिन्याच्या शेवटच्या10 दिवसांत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. बुधवार 21 मे ते शनिवार 31 मे पर्यंतच्या दहा दिवसांत मुंबईसह संपूर्ण कोकणातील 7 जिल्ह्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील 10 व मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात सोमवार 19 मे पासून पुढील आठवडाभर म्हणजे रविवार 25 मेपर्यत जोरदार तर विदर्भातील 11 जिल्ह्यात यादरम्यान मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सुपा मंडळात ५३.८ मिमी पावसाची नोंद
पारनेर- तालुक्यातील सुपा मंडळात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तीनच दिवसांत 53.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, जी तालुक्यातील दहा मंडळांपैकी सर्वाधिक आहे. सुपा मंडळासह पारनेर तालुक्यातील एकूण दहा मंडळांमध्ये गेल्या आठवड्यात सरासरी 148 टक्के पाऊस नोंदवला गेला. या पावसाने काही ठिकाणी नाले आणि बांध तुडुंब भरले, तर काही गावांमध्ये ओढे प्रवाहित झाले. पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेती मशागतीला सुरुवात केली आहे. मात्र, हा पाऊस खरीप पिकांच्या पेरणीसाठी पुरेसा नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.