सांगली / नगर सह्याद्री :
इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यातील बाजूच्या गावांना वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. दिवसभर असलेल्या प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे गारवा जाणवला. मात्र शाळू व गहू काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. प्रारंभी सोसाट्याचा वारा व विजांचा कडकडाट झाला. त्यानंतर पावसाचे जोरदार आगमन झाले. सुमारे अर्धा ते एक तास पाऊस झोडपून काढत होता.
नवेखेड येथे गारांचा मारा झाला. तर इस्लामपूर निर्णय किल्लेमच्छिंद्रगड या परिसरात जोरदार पाऊस झाला. अचानकच सुरू झालेल्या या पावसाने शहरातील बाजारपेठेत तारांबळ उडाली. शेतात उघड्यावर असलेल्या कडबा काढून पडलेले शाळू व गहू यांच्या जनावरांसाठी गंजी टाकण्यासाठी परिसातील शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती.
पाऊस होणार याबाबत दहा दिवसांपासून चर्चा असल्याने अनेक नागरिक शेतकरी सावध होते. त्यातूनही काही जणांचा काढून पडलेला गहू व शाळू भिजला. हा पाऊस उष्म्यासाठी गारवा निर्माण करणारा ठरला मात्र काही शेतकऱ्यांना नुकसानीचा ठरला.