पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस, गारपीठ यामुळे हातात आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचा तातडीने पंचनामा करुन अहवाल शासनास सादर करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
अवकाळी पावसाने राज्यात थैमान घातले आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. ऐन उन्हाळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्यावरून खळखळून पाणी वाहिले. पारनेर तालुक्यात बुधवारी रात्री आणि गुरुवारी सायंकाळी अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. तालुक्यातील काकणेवाडी येथे गारपीट झाली.
बुधवारी सायंकाळी पारनेर, सुपा, टाकळी ढोकेश्वर, ढोकी, धोत्रे, वडगाव सावताळ, तिखोलसह अनेक गावांना अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाऱ्यामुळे गहू, हरभरा, कांदा, ज्वारी, बाजरी, मका यांच्यासह फळबागायत व भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. गारपीटमुळे कांद्याची पात व कांदा भूईसपाट झाला आहे. शेतात असलेल्या कांद्यात पाणी शिरल्याने कांदा सडण्याची भिती निर्माण झाली आहे.
गहू, ज्वारी, मका, बाजरी वादळामुळे जमीनदोस्त झाले असून गारपीठीमुळे हातात आलेली ही पिके मातीत मिसळली आहेत. अनेक झाडांच्या फांद्या तुटल्याने त्यावरील फळांचे नुकसान झाले आहे. दरम्यान भाजीपाल्याचेही गारपीठीमुळे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे कांदाचाळी तसेच घरावरील पत्रे उडाल्याने मालमत्तेचीही नुकसान झाले आहे.