अहमदनगर। नगर सहयाद्री
यंदा मे महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळतायेत. नगर जिल्ह्यात देखील पावसाला सुरवात झाली आहे. अचानकपणे आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. श्रीरामपूरासह कोपरगाव तालुक्यात वादळी पावसाने अचानक एन्ट्री केली.
यामुळे शहरासह तालुक्यातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली. तर विजेचे पोलही वाकले. त्यामुळे शहरात वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळी वार्याबरोबर सुमारे अर्धा तास चाललेल्या पावसाने अनेक ठिकाणच्या रस्त्यावर पाणी साचले होते. तर ग्रामीण भागातील शेतकर्यांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले.
अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आला असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. त्यामुळे बळीराजाच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची देखील तारांबळ उडाली होती.
श्रीरामपूरात झाडे पडल्याने वाहतुकीला खोळंबा
वादळी पावसाने श्रीरामपूर शहरातील वडाळा महादेव परिसरात तसेच शहरात अक्षय कॉर्नर,डीडी काचोळे शाळे समोर तसेच राहिंज हॉस्पीटल समोर झाडे पडल्याने वाहतुकीला खोळंबा निर्माण झाला होता. काही भागात विद्युत पोल वाकले, वीज तारा तुटल्या अवकाळीने सर्वांची दाणादाण केली होती तर अनेक भागात वीज गायब झाली होती. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.
कोपरगावात तीन पॉलिहाऊसची शेड उद्ध्वस्त
तालुक्यातील पूर्व भागातील करंजी परिसरात गुरुवारी दोन वाजेच्या सुमारास आवकाळी पावसाने एन्ट्री केली. या आवकळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे परिसरात पॉलिहाऊसची तीन शेड उद्ध्वस्त झाले असून जनावरांच्या शेड असे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आज कसे असेल हवामान?
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ठिकाण बदलून अवकाळी पावसासह वादळाचा तडाखा बसत आहे. यामुळे अनेक तालुक्यात पशुधनासह मनुष्यहानी आणि घरांच्या नुकसानीसोबत पाणी टंचाईत कशाबशा वाचलेल्या फळबागांना फटका बसतांना दिसत आहे. त्यातच आता पुन्हा आज शुक्रवार दि.१७ मे. रोजी भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
नगर जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती
पाणी टंचाईमुळे नगर जिल्ह्यातील अनेक भागात सध्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. नगर जिल्ह्यात शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसाय करतात. जिल्ह्याचा विचार केला तर सध्या जिल्ह्यात 13 लाख 16 हजार मोठी जनावरे आहेत. 2 लाख 83 हजार लहान जनावरे आहेत तर 14 लाख 79 हजार शेळी मेंढीची संख्या आहे. मागील पावसाळ्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने नगर दक्षिण च्या अनेक तालुक्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न देखील शेतकऱ्यांना सतावत आहे.