मुंबई | नगर सह्याद्री:-
बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा तमिळनाडूसह दक्षिणेतील राज्यांना फटका बसला असून कमी दाबाचा पट्टा आता वायव्येकडे सरकत आहे. परिणामी महाराष्ट्रात पुढील 3 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आता वायव्येकडे सरकत असल्यानं महाराष्ट्रात सध्या असणारी कडाक्याची थंडी ओसरणार असून तापमानाचा टक्का वाढणार आहे.
तळ कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुढील 3 दिवस हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याचं सांगण्यात येत आहे. मंगळवार 3 डिसेंबरला तळकोकणातील सिंधूदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला असून बुधवारी सिंधूदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापुरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुणे, सोलापूर, सांगली, तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर नांदेड जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वातावरण दमट व ढगाळ राहणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ‘फेंगल’ चक्रीवादळाने तमिळनाडूच्या किनारपट्टीला धडक दिल्यानंतर पुद्दुचेरी, कुड्डालोर आणि विल्लुपूरम् यांच्या शेजारी भागात अल्प दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. हे चक्रीवादळ हळूहळू पश्चिमेकउे सरकेल आणि नंतर त्याची तीव्रता न्यून होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.