मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात तापमानात वाढ झाल्याचे दिसत आहे. काही भागात तापमानाने चाळीशीपार केली आहे. एकीकडे तापमानात वाढ होत असतानाच राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा देखील इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यातील काही गावांत अवकाळी पावसाने हजेरी लावली.
अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आज अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये पूर्व मोसमी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट दिला आहे. 31 मार्च रोजी हवामान विभागाने सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. यावेळी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, मुंबई, जळगाव, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांमध्येही विजाच्यां कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता आहे.
पुढील तीन-चार दिवस हलका, मध्यम स्वरूपाचा पाऊस
केरळ आणि दक्षिणेकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात बदल होणार आहे. याचा परिणाम राज्यावर येत्या दोन ते तीन दिवसात दिसून येणार आहे. वातावरणातील बदलामुळे पुढील तीन ते चार दिवसांत जिल्ह्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून प्रचंड उकाडा वाढला आहे.
अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकरीही चिंतेत आहे. दरम्यान, हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पावसामुळे रब्बी हंगामातील काढण्यासाठी आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.