श्रीगोंदा । नगर सहयाद्री-
यंदाच्या वर्षी थंडीचे प्रमाण कमी राहिल्याने व उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने कांद्याच्या साईज वर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अवकाळी पावसामुळे तालुक्यात कांद्याच्या काढणीला वेग आला आहे. कांदा काढण्यासाठी इतर गावातील मजूर कांदा उत्पादकाच्या शेतात दाखल झाले आहेत हे मजूर प्रति एकर १२ ते १३ हजार रुपये याप्रमाणे कांदा पीक काढण्याची मजुरी घेत आहेत.
सध्या मजुरांना ४०० ते ५०० रुपये मजुरी शेतकऱ्याला द्यावी लागत आहे. बहुतांश ठिकाणी कांदा काढणी पूर्ण झालेली असून कांदा शेतातच अरणी करून साठवल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र सध्या कांद्याला समाधानकारक बाजार भाव नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. काढणी केलेल्या कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे.
कांदा रोप उपलब्ध करण्यापासून ते लागवड, खुरपणी, भरणी, औषधे फवारणी, आदींपासून ते काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा खर्च होतो. त्यातच समाधानकारक बाजार भाव मिळाला नाही तर खर्च निघत नसल्याचे खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. त्यामुळे कांदा साठवणुकीला वेग आला आहे. कांद्याला हमीभाव देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
आगामी काळात दर मिळाल्यास शेतकऱ्यांचा फायदा
यंदा तीन ते चार एकरां वर रब्बी कांद्याची डिसेंबर, जानेवारी महिन्या मध्ये लागवड केली होती. जवळपास चार महिन्यांनी कांदा काढणीला आला आहे सध्या तालुक्यात अवकाळी पाऊस अनेक ठिकाणी होत आहे त्यामुळे सध्या कांदा काढण्यासाठी १२ ते १३ हजार रुपये दर चालू आहे. आगामी काळात कांद्याला चांगला दर मिळाल्यास काही प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होईल.
– शेतकरी सतीश पाडळे, दादासाहेब ननवरे