spot_img
अहमदनगरविस्थापित झाले आता प्रस्थापित!

विस्थापित झाले आता प्रस्थापित!

spot_img

सारीपाट / शिवाजी शिर्के
काना-मात्रा- वेलांटी नसणारं शहर ही कधी काळी ओळख असणाऱ्या अहमदनगरचं नामकरण एकदाचं अहिल्यानगर असं झालं! नामकरणातून हाती काय पडलं याचा शोध आता साऱ्याच पातळीवर घेतला जाईल. राजकीय दृष्टीकोनातून विचार केला तर नगरचं नाव जसं बदललं तसं नगरचं राजकारण देखील! विस्थापितांच्या विरोधात लढणाऱ्यांना बळ देता देता आता विस्थापितच प्रस्थापित होऊ लागले असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे विस्थापित देखील आता प्रस्थापितांच्या रांगेत बसलेले दिसून येऊ लागले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात नक्की विस्थापित कोण आणि प्रस्थापित कोण हे शोधण्याची वेळ सामान्य जनतेवर आलीय. लोकसभे पाठोपाठ विधानसभेचा बिगुल वाजण्यास काही दिवसांचा अवधी बाकी असताना बारा किल्ल्यांचे किल्लेदार कोण असणार याचे आडाखे बांधले जात आहेत. हे आडाखे बांधताना किल्लेदारांकडून आपली सुभेदारी कायम राहील याची काळजी घेतली जात आहे तर जनतेकडून ही सुभेदारी मोडीत काढली जाते की पुन्हा बहाल केली जाते हे पाहण्यासाठी थोडसं थांबावं लागणार आहे. जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यास आता येथे कोणीच विस्थापित राहिलेला नसल्याचेच दिसून येते. प्रस्थापितांच्या विरोधात लढतोय म्हणून मतदान करा असं सांगणारे स्वत:च प्रस्थापित झालेत! संस्थानिक नाही, फाटका आहे असे सांगण्यातही आता काहीच राहिलेले नाही. जिल्ह्यातील जनतेच्या समोर साऱ्यांचाच सातबारा आला आहे. त्यामुळे येणारी निवडणूक ही विस्थापितांची नव्हे तर प्रस्थापितांचीच असणार असून त्यांना अधिक प्रस्थापित करण्यासाठी मतदार कोणाच्या पारड्यात किती मते टाकतात एव्हढेच सोपस्कर बाकी आहे.

कोतकरांच्या संभाव्य उमेदवारीने चुरस; संग्राम जगताप हॅट्ट्रीकसाठी सज्ज
नगर शहरातून सलग दोन वेळा विधानसभेवर प्रतिनिधीत्व करणारे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी विकास कामांच्या मुद्यावर मतदारांना भावनिक साद घालत जुना विश्वास पुन्हा वृद्धींगत करण्याचे आवाहन केले आहे. या मतदारसंघातून माजी महापौर संदीप कोतकर हे उमेदवारी करणार असल्याचे बोलले जाते. त्यांच्या समर्थकांकडून अपक्ष उमेदवारीचेही बोलले जाते. कोतकरांची अपक्ष उमेदवारी जगतापांच्या तोट्याची असल्याची चर्चा झडते आहे. मात्र, जगताप यांनी गेल्या पाच वर्षात केडगावसह शहरात कोतकर आपल्या सोबत राहणार नसल्याचे गृहीत धरुनच तयारी चालवली होती हेही दुर्लक्षून चालणार नाही. महाविकास आघाडीकडून कोतकर यांना उमेदवारी देण्यास मविआतील स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. मात्र, कोतकर यांनी काहीही झाले तरी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय मविआकडून इच्छुकांची संख्या अर्धाडझनपर्यंत गेली आहे. राष्ट्रवादीकडून माजी महापौर अभिषेक कळमकर, डॉ. अनिल आठरे, काँग्रेसकडून किरण काळे आणि मंगल भुजबळ, शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड यांनी तयारी चालवली आहे. मविआत ही जागा नक्की कोणाच्या वाट्याला जाते आहे हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे संग्राम जगताप यांच्याकडून मतदार, कार्यकर्ते आणि विविध संघटना यांच्या गाठीभेठींचा धडाका चालू असून तीन- तीन वेळा त्यांनी भेटीगाठी घेतल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत हॅटट्रीक करण्यास सज्ज झालेले संग्राम जगताप यांनी विकास कामांचा मुद्या रेटला आहे.

श्रीगोंद्यातून पाचपुते- जगताप- नागवडे यांच्यात रंगणार सामना!
महायुतीतील भाजपाकडून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या घरात उमेदवारी नक्की असल्याचे मानले जात होते. विक्रम पाचपुते की त्यांच्या मातोश्री प्रतिभा पाचपुते याचा तिढा जवळपास सुटल्यात जमा असून विक्रम पाचपुते यांची उमेदवारी अंतिम मानली जात आहे. दुसरीकडे मविआकडून माजी आमदार राहुल जगताप यांची उमेदवारी देखील अंतिम करण्यात आल्याचे बोलले जाते. म्हणजेच विक्रम पाचपुते आणि राहुल जगताप यांच्यात येथील लढाई अंतिम मानली जात असताना शिवाजीराव नागवडे यांच्या स्नुषा अनुराधा नागवडे यांनी ‌‘आता नाही तर कधीच नाही‌’, अशी भूमिका घेतली आणि निवडणुकीच्या मैदानात त्या उतरणार आहेत. या मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे आता जवळपास नक्की झाले आहे. मात्र, त्यातही शेवटच्या क्षणी घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार हे काय भूमिका घेतात हेही पहावे लागणार आहे. बाळासाहेब नहाटा यांनी अलिकडेच अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. त्यांची भूमिका देखील निर्णायक असणार आहे.

राणी लंके यांच्या विरोधात कोण? संपता संपेना शोध, नीलेश लंके यांना खुणावतेय खासदारकी पाठोपाठ आमदारकीही!
नीलेश लंके यांनी लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर फक्त पारनेरचीच समिकरणे बदलली असं नाही तर संपूर्ण जिल्ह्यातच त्याचे पडसाद उमटले. ती निवडणूक नगर लोकसभेची होती. मात्र, विरोधात असणाऱ्या सुजय विखे यांना नीलेश लंके यांनी पराभूत केल्यानंतर त्याचे पडसाद थेट जिल्ह्यात उमटले आणि ते स्वाभाविकच! पारनेरमधून नीलेश लंके यांच्या सौभाग्यवती राणीताई यांचीच उमेदवारी शरद पवार गटाकडून अंतिम आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून डॉ. श्रीकांत पठारे आणि संदेश कार्ले, माधवराव लामखडे या तिघांनी येथून उमेदवारीची मागणी केली आहे. डॉ. पठारे यांनी मतदारसंघ पिंजून काढला असून उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त केला आहे. मतदारसंघासह राज्यात नीलेश लंके यांची वाढलेली ताकद विचारात घेता त्यांच्याच मजनुसार पारनेरचा उमेदवार ठरणार यात शंका नाही. त्यांच्या समर्थकांकडून राणीताई यांच्यासाठी असणारा मोठा आग्रह आणि मागणीचा विचार केला तर त्याच उमेदवार असणार यात शंका नाही. विरोधी महायुतीकडून उमेदवार कोण हे अद्यापही समोर यायला तयार नाही. सुजित झावरे, काशिनाथ दाते, विश्वनाथ कोरडे, सुनील थोरात आदी नावे चर्चेत असली तरी यातील कोण हे अद्यापही स्पष्ट व्हायला तयार नाही. सुजित झावरे हे यावेळी थांबायला तयार नाहीत. काशिनाथ दाते यांची उमेदवारी अजित पवार यांच्याकडून अंतिम झाल्याचे बोलले जात आहे.

वाड्यावरच्या दरबारी राजकारणाचा थाट प्राजक्त तनपुरे यांना नडणार!
महाविकास आघाडीचे सरकार असताना पहिल्याच टर्ममध्ये राज्यमंत्री पदाची लॉटरी लागलेल्या प्राजक्त तनपुरे यांच्या दरबारी राजकारणामुळे राहुरीकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कर्डिले यांच्या विरोधात लाट निर्माण करत प्राजक्त तनपुरे निवडून आले! त्यांच्या विजयात कर्डिले यांच्याकडून दुखावलेल्या अनेकांची मदत झाली होती. मात्र, निकालानंतर तनपुरे यांनी त्यांना त्यांच्या निवडणुकीत मदत करणाऱ्या सर्र्वांनाच वाऱ्यावर सोडले. कर्डिलेंनी दुखावलेल्या अनेकांनी तनपुरे यांना पहिल्या निवडणुकीत कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत केली होती. तनपुरे यांना त्याची जाण राहिली नाही. कोणाचेही फोन न घेणे आणि पीए संस्कृतीवर अवलंबून राहणे, हा सुजय विखे यांच्या पराभवातील प्रमुख मुद्दा तनपुरे यांना देखील लागू पडणार आहे. स्वत:च्याच खुशमस्कऱ्यांच्या टोळीत कायम मश्गुल राहिले. प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्री पदामुळे त्यांच्या डोक्यात हवा गेली. तीच हवा आता त्यांचा अडसर ठरणार आहे. मागील पराभवानंतर शिवाजीराव कर्डिले यांनी अधिक व्यापक संपर्क वाढवला आणि आपल्या कामाच्या पद्धतीत बदल केला. हाच बदल आता कर्डिले यांच्यासाठी फायद्याचा ठरल्यास आश्चर्य वाटू नये.

रोहित पवारांना फाजील आत्मविश्वास नडणार!
राज्याचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या रोहीत पवार यांच्याकडून कर्जत- जामखेड मतदारसंघात पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना गेल्या पाच वर्षात अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळाली. पैशाची मस्ती आली असल्याची भावना यातून वाढीस लागली. मागील निवडणुकीत पराभूत होऊनही राम शिंदे यांनी या मतदारसंघात आपली नाळ कायम ठेवली. सुखदु:खाच्या प्रसंगात धावून जाणं आणि प्रसंगी शासनालाही जाब विचारण्याची भूमिका प्रा. राम शिंदे यांनी घेतली. त्यातूनच राम शिंदे यांना सहानुभूती मिळत गेली आहे. उलटपक्षी रोहीत पवार हे राज्य पातळीवरील नेते झाले. त्यातून स्थानिक संपर्क देखील त्यांचा तुटला. पैसे दिले की काहीही विकत घेता येते ही पवार यांची भावना निर्माण झाली आणि तीच भावना आता कर्जत- जामखेडमधील जनतेच्या स्वाभिमानाला हादरा देणारी ठरली आहे.

लहामटे यांच्या विरोधात वैभव पिचड-अमित भांगरे झाले सज्ज!
अकोल्यातून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार किरण लहामटे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार अद्यापतरी जाहीर झालेला नाही. अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना एक वर्षापूव अशोकराव भांगरे यांचे निधन झाले. लहामटे यांना आमदार करण्यात त्यांचाच वाटा राहिला. पिचड यांचे कट्टर विरोधक हीच त्यांची कायम ओळख राहिली. पंचायत समिती सभापती, समाजकल्याण समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. मागील निवडणुकीत वैभव पिचड यांच्या विरोधात लहामटे यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांना विजयी करण्यापर्यंत अशोकरावांची भूमिका निर्णायक राहिली. आता लहामटे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे महायुतीतून म्हणजेच भाजपामधून बाहेर पडण्याचा निर्णय वैभव पिचड यांनी घेतल्यात जमा आहे. त्यांनी मध्यंतरी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांचीही भेट घेतली. मात्र, पवारांनी त्यांना शब्द दिला नसल्याचे बोलले जाते. अशोकराव भांगरे यांचे चिरंजीव जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे हे मविआचे उमेदवार असल्याचे बोलले जाते. पिचड यांची या मतदारसंघातील जादू संपल्यात जमा असल्याचे बोलले जात असले तरी वैभव पिचड नक्की काय भूमिका घेतात यावरही बरेच काही अवलंबून आहे. अमित भांगरे यांनी तरुणांचे निर्माण केलेले मोठे संघटन आणि अशोकराव भांगरे यांच्या प्रती असणारी सहानूभुती ही त्यांची जमेची बाजू असणार आहे.

राजळेंच्या विरोधात घुले- ढाकणे सरसावले!
शेवगाव- पाथड मतदारसंघातून सलग दोनवेळा आमदारकी आणि त्या माध्यमातून केलेली विकास कामे या मुद्यांवर मोनिकाताई राजीव राजळे या तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज झाल्या आहेत. भाजपाकडून त्यांचीच उमदेवारी अंतिम मानली जात आहे. यावेळी देखील त्यांच्या विरोधात माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि प्रताप ढाकणे यांनी कंबर कसली आहे. चंद्रशेखर घुले व त्यांच्या समर्थकांनी अत्यंत आक्रमकपणे यावेळी तयारी चालवली आहे. कोणत्याही परिस्थितीत थांबायचे नाही असा चंगच त्यांनी बांधला असल्याचे दिसते. दुसरीकडे प्रतापराव ढाकणे यांनी लोकसभा निवडणुकीपासूनच तयारी चालवली आहे. लोकसभा निवडणुक स्वत:ची असल्यागत त्यांनी मतदारसंघ पिंजला. खा. लंके यांच्याबद्दल निर्माण झालेली लाट आणि त्याचा फायदा उठवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. जातीच्या फॅक्टरवर मतांचे राजकारण या मतदारसंघात चालते आणि त्याचाच फायदा आपल्याला मिळेल असा आशावाद ढाकणे यांना आहे.

काटे पेरले असले तरी शिडत विखेच!
शिड मतदार संघात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात वातावरण असल्याचा कांगावा केला जात आहे. राजेंद्र पिपाडा यांनी विखे यांच्या विरोधात आवाज उठवला आणि भाजपाने विखे यांना उमेदवारी ने देता आपल्याला द्यावी अशी मागणी केली. दुसऱ्याच दिवशी हेच पिपाडा थेट बाळासाहेब थोरात यांच्या व्यासपीठावर जाऊन बसले. पिपाडा यांचा बोलविता धनी कोण हे यातून समोर आले. गणेश कारखान्याच्या निवडणुकीत विखेंच्या विरोधात थेटपणे पहिल्यांदाच बाळासाहेब थोरात यांनी भूमिका घेतली आणि विवेक कोल्हे यांना मदत केली. विखे यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला. त्याच धतवर आता देखील विखे यांना घेरण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रभावती घोगरे यांचे नाव त्यातूनच पुढे आले आहे. अनेक वर्षे एकहाती सत्ता असल्याने विखे यांच्या विरोधात वातावरण असल्याचे चित्र रंगवले जाते. विकास कामे मोठ्या प्रमाणात माग लावली असली तरीही विखे यांनी ही निवडणूक अत्यंत गांभिर्याने घेतली असल्याचे दिसते. स्वत: विखे पाटील यांच्यासह सुजय विखे पाटील हे या मतदारसंघात तळ ठोकून आहेत.

सहानुभूतीची लाट शंकरराव गडाखांना पुन्हा तारणार!
स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केल्यानंतर विजयाचा गुलाल अंगावर पडताच नेवासाचे आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. या मंत्रीपदाच्या माध्यमातून मतदारसंघात मोठी विकास कामे माग लावण्याचा सपाटा त्यांनी लावला. जोडीने कार्यकर्त्यांची फळी देखील तयार केली. प्रशांत गडाख यांच्या आजारपणाने त्यांना धक्का बसला असला तरी सुनिताताई आणि युवा नेते उदयन गडाख यांनी प्रशांत गडाख यांची कमी जाणवू दिली नाही. उदयन यांनी युवकांचे मोठे संघटन केले आणि हेच संघटन शंकरराव गडाख यांच्यासाठी आता निर्णायक ठरणार आहे. गडाख यांच्या विरोधात कोण हे अद्यापतरी नक्की झालेले नाही. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, सचिन देसरडा ही नावे चर्चेत आहेत. गडाख यांचा करिष्मा यावेळी देखील या मतदारसंघात चालणार असल्याची परिस्थिती आहे.

पुन्हा एकदा रंगणार काळे- कोल्हे लढाई!
महायुतीत काळे आणि कोल्हे हे दोघेही एकत्र! मात्र, असे असले तरी या दोघांमध्ये विळ्याभोपळ्याचे सख्य! गेल्या दोन-अडीच वर्षात आमदार आषुतोष काळे यांनी मतदारसंघात सत्तेच्या माध्यमातून विविध विकास कामे केली. भाजपाचे विवेक कोल्हे यांच्याशी त्यांचे सूत जुळले नाही. कोल्हे यांनीही दिसेल तेथे काळे यांच्या विरोधात भूमिका घेतली आणि काळे यांनीही तेच केले. या दोघांमधील अंतर कमी झालेच नाही. त्यातूनच आता कोल्हे यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा आणि तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तुतारी आणि घड्याळ या दोन चिन्हांमधील पर्याय मतदारांना निवडायचाय म्हणजेच काळे हवे की कोल्हे याचा फैसला पुन्हा एकदा करायचा आहे. कोल्हे यांच्या पाठीशी यावेळी बाळासाहेब थोरात हे जाहीरपणे असणार असल्याने त्याचा फायदा कितपत होतो हेही दिसणार आहे.

श्रीरामपूरमध्ये लहू कानडे यांना पुन्हा पसंती मिळणार का?
आरक्षीत मतदारसंघ असणाऱ्या श्रीरामपूर मतदारसंघात मागील वेळी काँग्रेसचे लहू कानडे हे विजयी झाले. कानडे यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात कामे माग लावताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना साथ दिली. प्रशासकीय अधिकारी म्हणून केेलेल्या कामाचा त्यांना फायदाच झाला. त्यातूनच त्यांची वेगळी प्रतिमा श्रीरामपूकरांसमोर निर्माण झाली. कानडे यांच्या विरोधात महायुतीकडून सदाशिव लोखंडे यांच्या चिरंजीवाचे नाव चर्चेत आहे. कानडे हेच महाविकास आघाडीचे येथील उमेदवार असताना त्यांच्यासमोर महायुतीचा उमेदवार कोण हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही.

संगमनेरमध्ये थोरातांचाच गुलाल, मात्र…!
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा संगमनेर विधानसभा मतदारसंघ कायम बाळासाहेब थोरात यांना साथ देत आला आहे. विरोधी उमेदवार कोणीही असला तरी येथे बाळासाहेब थोरात यांचाच करिष्मा चालला आहे. लोकसभा निवडणुकीत विखे यांच्या विरोधात थेट संगमनेरची यंत्रणा बाळासाहेबांनी नगरमध्ये उतरवली. थोरातांच्या या कृतीचे उट्टे काढण्यासाठी आता स्वत: सुजय विखे हे संगमनेरमध्ये लढण्यास सज्ज झाल्याचे दिसते. भाजपाने उमेदवारी दिल्यास लढणार अशी भूमिकाच त्यांनी घेतली आहे. थोरात विरुद्ध विखे अशी लढत येथे झाल्यास ती लक्षवेधी ठरणार! त्याहीपेक्षा थोरात यांना मतदारसंघातच गुंतून पडावे लागण्याची दाट शक्यता यातून निर्माण होऊ शकते. मात्र, हे सारे सुजय विखे यांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर; राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त

राणीताई निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर; राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर...

राणीताई लंके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?; महायुतीत एकमत होईना

तिरंगी-चौरंगी लढतीची शक्यता गणेश जगदाळे | नगर सह्याद्री विधानसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहे. पारनेर...

पवारांच्या नातवाकडून कर्जत-जामखेडकरांचा भ्रमनिरास; रोहित पवारांविरोधात तरुणाई देखील एकवटली

साधा माणूस म्हणून राम शिंदेंचा मार्ग झाला अधिक सुकर कर्जत | नगर सह्याद्री पवारांचा नातू म्हणून...

जागावाटपाआधीच आघाडीत बिघाडी; काँग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीचा अर्ज…

मुंबई / नगर सह्याद्री - महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे सूत्र अद्याप जाहीर झालेले नाही. कोणती...