उत्कृष्ट आरास स्पर्धेत सिद्धेश्वर तरुण मंडळ व समर्थ युवा प्रतिष्ठान प्रथम
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
आता वोकीझम, इस्लामिक व ख्रिस्चनिटी हातात हात घालून हिंदुत्वावर आक्रमण करत आहेत. हिंदू कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करत स्त्री शक्ती डळमळीत करीत आहेत. यासाठी पुरोगामी विचाराचे त्यांना सहकार्य करत आहेत. त्यांनीच गेल्या २० ते ३० वर्षांपासून स्त्री पुरुष समानतेचे नॅरेटिव्ह सेट केला आहे. त्याचा परिणाम आता दिसत आहे. पण हिंदू धर्मात स्त्री पुरुष समानता कधीच नव्हती. कारण हिंदू धर्मात स्त्रीला सर्वोच्च व सर्वश्रेष्ठ स्थान दिले आहे व पुरुषांना कनिष्ठ स्थान दिले आहे. त्यामुळे या हिंदू संकृतीला डळमळीत करणार्या वोकीझम संकटाला समजून घ्या व पुरून उरा, असे आवाहन पुण्याचे शिवशंभु व्याख्याते नीलेश भिसे यांनी केले.
अहिल्यानगरमध्ये विचार भारती व बन्सीमहाराज मिठाईवाले यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या गणेशोत्सव उत्कृष्ट आरास स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात व्याख्याते नीलेश भिसे हे उपस्थित गणेश मंडळांच्या युवकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप, विश्व मांगल्य संस्थेच्या अध्यक्षा धनश्री विखे व महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, स्पर्धेचे प्रायोजक बन्सीमहाराज मिठाईवालेचे राजकुमार जोशी, विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे, मंजुश्री कुलकर्णी, स्पर्धा प्रमुख रवींद्र बारस्कर, अंकुश गोळे, सर्व परीक्षक, विविध क्षेत्रांतील नागरिक आदींसह मोठ्या संख्यने गणेश मंडळांचे कार्यकर्ते व सर्व ढोल पथकातील वादक उपस्थित होते.
आपण पराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे वैचारिक वारस आहोत. त्यांनी आयुष्यभर हिंदुत्वाशी तडजोड न करता हौतात्म्य पत्करले. त्यामुळे हिदूंनीही हिंदुत्वाशी तडजोड न करता संघटित राहावे. जागरूक राहून वाढत असलेल्या गोहत्या, लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतराला प्रतिबंध होण्यासाठी काम करावे असे नितीन भिसे पुढे म्हणाले. गणेशोत्सव ज्या उद्देशाने सुरू झाला त्याचा विसर सर्वाना पडला असताना गलिच्छ संस्कारहीन कार्यक्रमांना फाटा देत जागराचे, हिंदुत्वाचे व राष्ट्रभाक्तीचे देखावे अहिल्यानगर मधील मंडळांनी सादर करत उत्कृष्ट काम केले आहे. युवकांना याची प्रेरणा विचार भारती संस्था देत आहे.
अहिल्यानगरमध्ये आत डॅशिंग आमदार संग्राम जगताप असल्याने वातावरण बदलत आहे.यावेळी धनश्री विखे यांनी अशा चांगल्या उपक्रमात महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. आयक्त यशवंत डांगे व गोविंद जोशी यांनीही मार्गदर्शन केले. स्पर्धा प्रमुख रवींद्र बारस्कर यांनी स्पर्धेची माहिती दिली. सुधीर लांडगे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. अनंत जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर अंकुश गोळे यांनी आभार मानले.
प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक स्व. माधव कुलकर्णी व गजानन मेहंदळे यांना सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. विचार भारतीचे अशोक गायकवाड, डॉ. विक्रम दीडवाणिया, सुनील नागोरी, राहुल गांधी, समाप्त नलावडे, मनोज जोशी, राहुल जामगावकर, कमलेश भंडारी, विशारद पेटकर व श्री. भिंगारदिवे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.उत्कृष्ट देखावा स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे. प्रथम विभागून श्री सिद्धेश्वर तरुण मंडळ तोफखाना (देखावा धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ), युवा प्रतिष्ठान भिंगार (देखावा स्वराज रक्षक ताराराणी), द्वितीय विभागून सम्राट तरुण मंडळ भिंगार (देखावा शिवराज्याभिषेक सोहळा) व शिवगर्जना प्रतिष्ठान माणिक चौक (देखावा सिंदूर देश के बेटी का), तृतीय बंगाल चौकी मित्रमंडळ (देखावा दमडी), चतुर्थ विभागून नंदनवन मित्रमंडळ (देखावा आई हिरकणी) व चौपाटी कारंजा मित्रमंडळ ट्रस्ट (देखावा गड किल्ले संवर्धन). या शिवाय उत्तेजनार्थ पारितोषिके राजयोग प्रतिष्ठान, समझोता तरुण मंडळ, क्रांतिवीर प्रतिष्ठान, बालाजी युवक मंडळ, जय हिंद तरुण मंडळ, नवग्रह मित्रमंडळ, राजमुद्रा प्रतिष्ठान व धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान. तसेच शहरातील सर्व ढोल पथक रुद्रवंश, रुद्रनाद, तालयोगी, गणांत, युगंधर, हिंदवी, शौर्य, नाद, रामराज्य, आम्ही नगरकर, श्री विशाल वाद्य पथक ढोल पथकांचा विशेष सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.
हिंदूंनी हिंदूंच्या मदतीला जाणे आवश्यक ः आ. जगताप
नगर शहरात विचार भारतीने वैचारिक परिवर्तन घडण्यासाठी काम सुरू करून आपली संस्कृती जपली आहे. हिंदूंनी हिंदूंच्या मदतीला जाणे आवश्यक झाले आहे. यासाठी मी प्रयत्नशील आहे. शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास असलेला ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटास नितीन भिसे यांनी प्रखर विरोध केल्याने तो प्रदर्शित झाला नाही. आता बंगाल फाइल्स चित्रपट येत आहे. हा वास्तव चित्रपट सर्व नागरिकांना पहावा, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.