अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नांदेडचा शिवराज राक्षे याचा पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने पराभव केल्यानंतर राक्षेने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत त्यांना लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर गोंधळ उडाला. “मी डबल महाराष्ट्र केसरी आहे, तिसऱ्यांदा होणार होतो, माझ्यावर अन्याय झाला,” असा आरोप राक्षेने केला आहे.
अहिल्यानगरीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढतहोती. यंदा महाराष्ट्र केसरी२०२५ चामानकरी कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी नेते उपस्थित होते.
नेमकं काय घडलं?
नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपांत्य फेरीचा सामना सुरू होता. सामन्यात राक्षेचा पराभव झाल्याचे जाहीर केल्यानंतर राक्षे संतापला आणि त्याने थेट पंचांनाच लाथ मारली. एवढेच नाही तर त्याने पंचांची कॉलरही पकडली होती. या प्रकारानंतर पोलिसांना हस्तक्षेप करत हे भांडण सोडवावे लागले. या प्रकारानंतर शिवराज राक्षेने कुस्तीचा रिव्ह्यू दाखवण्याची मागणी केली. “माझे खांदे आणि पाठ टेकलेली असेल तर मी स्वतःच कुस्ती सोडून बाहेर पडतो,” असे राक्षेने म्हटले आहे.