मुंबई । नगर सहयाद्री
महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे आता शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र विजयी मेळावा घेणार आहेत. मोर्चा रद्द झाल्यानंतर आता ५ जुलै रोजी विजयी मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही भाऊ एकत्र येणार असून मराठी जनतेला संबोधित करणार आहेत. हा मेळावा वरळीतील डोम सभागृहात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर काल ३० जून रोजी मनसे आणि ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी मेळाव्याच्या आयोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली.
सोमवारी या मेळाव्याच्या आयोजनानिमित्त शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि मनसेचे नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची काल रात्री उशिरा बैठक पार पडली. सांताक्रुझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
राज-उध्दव ठाकरे बंधुंच्या उपस्थित होणार्या सोहळ्याविषयी माहिती देताना खासदार संजय राऊत म्हणाले, माझी याबाबत काल राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. तसेच आमच्या लोकांची एक बैठकही झाली. या सोहळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क अर्थात शिवतीर्थाची जागा मिळावी, अशी आमची इच्छा होती. त्यासाठी शिवसेनेने अर्जही केला आहे. शिवतीर्थावर परवानगी मिळावी, यासाठी अनिल परब प्रयत्न करत आहेत. परंतु हे सरकार आम्हाला शिवतीर्थावर परवानगी देईल, असे वाटत नाही.
त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आम्हाला वरळीतील डोम सभागृहाचा पर्याय सुचवला असून आम्ही सर्वांनी तो स्वीकारला आहे. या सभागृहात ५ जुलै रोजी दुपारी १२ ते साडेबारा वाजता या सोहळ्याला सुरुवात होईल. या व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्याला एकत्र व्यासपीठावर दिसतील. याबाबत आता कोणतीही शंका असण्याचे कारण नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राऊत यांनी स्पष्ट केले की हा केवळ मनसे व शिवसेनेचा (ठाकरे) कार्यक्रम नसेल. मराठीसाठी लढणार्या सर्वांनाच आम्ही या कार्यक्रमाला आमंत्रित करू. ते म्हणाले, मराठीसाठीच्या या लढ्यात सहभागी असलेल्या सर्वांना आम्ही आमंत्रित करणार आहोत. मराठी माणसाची एकजूट ही राजकीय पक्षांपलिकडे आहे.