अहिल्यानगर । नगर सहयाद्री
शहरातील रामवाडी झोपडपट्टीत घुसून दहशत माजविणाऱ्या गुंडासह त्याच्या टोळीवर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी रामवाडीच्या नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन कारवाई करण्याचे निवेदन दिले.
यावेळी दलित महासंघाचे सुनील उमाप, सागर साठे, प्रकाश वाघमारे, विकास उडानशिवे, पप्पू पाटील, सतीश साळवे, सुरेश वैरागर, रवी साठे, विशाल उल्हारे, भास्कर जाधव, संजय परदेशी, बंटी साबळे, राकेश राजपूत, गणेश ससाणे, पप्पू पाथरे, सोमनाथ अडागळे, राहुल मंडलिक, अमोल लोखंडे, विशाल कांबळे, कांता खुडे, मोना गाडे, अलका साबळे, मंगल चांदणे, अनिता चांदणे, अंजली शेलार, वैशाली साबळे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रामवाडी झोपडपट्टीत रविवारी (दि.15 डिसेंबर) घुसून वाहनांची तोडफोड करुन दांडके व तलवारीने मारहाण केल्याप्रकरणी सूरज जाधवसह पाच जणांवर तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील आरोपी कायम रामवाडीत दमदाटी करुन दशहत निर्माण करत आहे. झोपडपट्टीत त्यांचे अनेक अवैध व्यवसाय असून, बिंगो जुगाराची स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्याने त्याचा राग मनात धरुन रामवाडीत 40 ते 50 जणांच्या टोळक्यांसह धुडगूस घालण्यात आला आहे. तर दिसेल त्याला मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
रविवारी घडलेला मारहाणीचा प्रकाश स्थानिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. या प्रकारामुळे रामवाडीकर भयभीत झाले असून, येथील अवैध धंदे व गुंडांच्या दहशतीने लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. सदर आरोपीवर पोलीस स्टेशनमध्ये अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असून, तो कायम गरीब, दलित, मागासवर्गीय युवकां टार्गेट करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रामवाडी झोपडपट्टीत घुसून दहशत माजविणाऱ्या गुंडासह त्याच्या टोळीवर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.