अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार सोमवारी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना सोमवारी (दि.14 जुलै) जाहीर केली. याबाबतचे राजपत्र प्रसिध्द करण्यात आले असून आता या प्रारूप प्रभाग रचनेवर पुढील सात दिवसांत म्हणजेच 21 जुलैपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत. दरम्यान या नव्या जिल्हा परिषद प्रारूप गट-गण रचनेत जामखेड तालुक्यात एक गट व दोन गण वाढले आहेत.
तसेच कर्जत तालुक्यातही एक गट व दोन गण वाढले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदची सदस्यसंख्या डॉनने वाढणार आहे. पूव जिल्हा परिषद सदस्यसंख्या 73 इतकी होती तर आता 75 इतकी होईल, तर पंचायत समिती सदस्य संख्या 146 इतकी होती तर आता 150 इतकी होईल. दरम्यान ही प्रारूप प्रभाग रचना 2017 प्रमाणेच असल्याचे सांगितले जात असले तरी जिल्ह्यातील अनेक गावांचे गट बदलले आहेत. तर गटांचे नावही आहि ठिकाणी बदलल्याचे दिसून येते.
कर्जत-जामखेड मध्ये दोन गट व चार गण वाढले
गट-गण रचनेत जामखेड तालुक्यात एक गट व दोन गण वाढले आहेत. पूव जामखेड तालुक्यात खर्डा व जवळा जिल्हा परिषद गट होते व पंचायत समितीचे चार गण होते. याच गटातील गावे वेगळी करून नवीन साकत जिल्हा परिषद गट अस्तित्वात आला आहे. कर्जत तालुक्यात देखील एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गण वाढले आहे.
2017 नव्हे तर 2012 च्या प्रभाग रचनेत साम्य?
या प्रारूप प्रभाग रचनेत एक गाव एका रस्त्याला तर दुसरे गाव दुसऱ्या रस्त्याचे आहे. गट आणि गणाची प्रारूप रचना करतांना नेमके कोणते मापदंड वापरण्यात आले, याबाबत आता चर्चा असून यामुळे या रचनेवर सुचना व हरकती वाढण्याची शक्यता आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान 2012 मध्ये असलेल्या गट व गणांची नावे यंदाच्या 2025 च्या निवडणुकीत दिसत असून 2012 च्या प्रभाग रचना आणि 2025 प्रभाग रचनेत साम्य दिसत आहे.
गावांची फाटाफूट तर गटांची नावेही बदलली
या रचनेमध्ये काठावरील अनेक गावांचे गट बदलले आहेत. विशेषतः अहिल्यानगर, पारनेर तालुक्यात अनेक गावांमध्ये हा बदल झाला आहे. तर गटांची नावेही बदलली आहेत. उदा. देहरे गटाचे नाव नवनागपूर तर कान्हूर पठार गटाचे नाव जवळा असे करण्यात आले आहे.
आरक्षणाकडे लागले लक्ष
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना आता जाहीर झाली आहे. दरम्यान आता इच्छुकांची आरक्षणाकडे लक्ष लागले आहे. लवकरच आरक्षण देखील जाहीर होईल. त्यामुळे आता इच्छुकांनी तयारी सुरु केली असली तरी आरक्षणाकडे मात्र सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.