अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
लक्ष्मीनगर, तपोवन रस्ता येथील सहकारी गृह निर्माण संस्थेच्या परिसरातील जॉगिंग ट्रॅकवर दुचाकी नेण्यास मनाई केल्याच्या कारणावरून दोन तरूणांनी वयोवृध्द नागरिकासह एकूण चार जणांवर हल्ला केल्याची घटना गुरूवारी (1 मे) सायंकाळी 5.30 वाजता घडली. या हल्ल्यात धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला असून जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.
याप्रकरणी सुर्यकांत नारायण झेंडे (वय 83, रा. लक्ष्मीनगर, तपोवन रस्ता) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक राजु बेळगे व अभिमन्यु राजु बेळगे (दोघे रा. डोकेनगर, तपोवन रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी सुर्यकांत झेंडे आणि त्यांचे मित्र राजेंद्र दत्तात्रय शेटे जॉगिंग ट्रॅकवर सायंकाळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारत होते.
याच दरम्यान अभिषेक बेळगे आणि अभिमन्यु बेळगे हे दुचाकीवरून ट्रॅकवर येत होते. फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांनी त्यांना ट्रॅकवरून वाहन चालवू नये, असे शांततेने समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र यावरून संतप्त झालेल्या दोघांनी सुर्यकांत झेंडे आणि राजेंद्र शेटे यांच्याशी उध्दटपणे बोलून त्यांना मारहाण केली. यावेळी पोलीस भरती प्रक्रियेतील एक गोळा राजेंद्र शेटे यांच्या दिशेने फेकण्यात आला.
गोंधळ ऐकून निखील राजेंद्र शेटे आणि आनंद सुर्यकांत झेंडे मदतीला धावून आले, त्यांनाही मारहाण करण्यात आली. अभिमन्यु बेळगे याने धारदार शस्त्राने निखील शेटे यांच्या उजव्या गालावर आणि मानेवर, आनंद झेंडे यांच्या कानावर, मानेवर व खांद्यावर, तर राजेंद्र शेटे यांना मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.