अहिल्यानगर । नगर सहयाद्री :-
नगर–पुणे महामार्गावरील गव्हाणवाडी (ता. श्रीगोंदा) शिवारात नादुरुस्त ट्रक थांबवून केबिनमध्ये झोपलेल्या चालकाला दोघांनी कोयत्याचा धाक दाखवत लुटल्याची घटना २३ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजता घडली. या लुटारूंनी ट्रकचालकाकडील तब्बल ४० हजार रुपयांची रोकड लंपास केली.
बेलवंडी पोलिस ठाण्यात सागर जीवन कदम (वय ३७, रा. धाराशिव) यांनी फिर्याद दिली. ते आपल्या ताब्यातील मालट्रक (क्र. जीजे १५ एव्ही ४४२५) घेऊन नगर–पुणे महामार्गावरून जात असताना गव्हाणवाडी शिवारात ट्रक बंद पडला. रात्री तांत्रिक मदत मिळणे अशक्य असल्याने कदम यांनी ट्रक कडेला उभा करून केबिनमध्ये विश्रांती घेतली.
पहाटे मोपेडवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी दगडाने ट्रकची काच फोडून केबिनमध्ये घुसत कदम यांना कोयत्याचा धाक दाखवला आणि मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या जवळील ४० हजार रुपये बळजबरीने हिसकावून दोघेही पसार झाले. कदम यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिसांनी दोन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे



