अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. लिपिक तथा टंकलेखक अमित राजू पालवे व शिपाई उमेश दिगंबर शेंदुरकर या दोघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
शहरातील रस्त्यांवर विक्री व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांकडून महापालिका दररोज रस्ता बाजू शुल्क वसुली करते. यापूव ठेकेदाराकडून वसुली केली जात होती. मात्र ठेकेदार नियुक्त न झाल्याने मार्केट विभागातील कर्मचारी रोज ही वसुली करतात. त्यासाठी 15 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांकडून विभाग प्रमुखांना हप्ता दिला जात असल्याचे दोन कर्मचाऱ्यांच्या संभाषणाची ध्वनिफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे.
दोन कर्मचारी संभाषण करताना साहेबाला रोज दोनशे ते पाचशे रुपये देत असल्याचा उल्लेख केला गेला आहे. या ध्वनीफितीची मनपा आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी गंभीर दखल घेत उपायुक्त प्रियंका शिंदे यांना चौकशी करून चोवीस तासात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.या चौकशी अहवालात शिपाई उमेश शेंदुरकर यांनी मार्केट विभागातील कामकाजाच्या संभाषणाचे ध्वनिफीत तयार करून ती व्हायरल केल्याचे नमूद केले.
या प्रकरणात लिपिक अमित पालवे यांनी देखील शेंदूरकर यांना साथ दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. उमेश शेंदुरकर यांनी मद्यप्राशन करून तसेच अमित पालवे यांनीही गैरवर्तन केल्याने महापालिका अधिनियम कलम 56 (2) (फ) मधील तरतुदी व अटी, शतनुसार त्यांचे सेवा निलंबन करून महाराष्ट्र नागरी सेवा नियम (शिस्त व अपिल) नियम 1979 च्या नियम 8 नुसार दोघांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आल्याचे आयुक्तांच्या आदेश नमूद करण्यात आले आहे.