अहमदनगर । नगर सहयाद्री-
शहरातील रामवाडीतील लक्ष्मीमाता मंदिराजवळ मंगळवारी (दि.१८) रात्री १० च्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली. यावेळी युवकांचे भांडण मिटविण्यास गेलेल्या दोन्ही गटातील मुली व महिलांनाही शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांच्या महिलांनी दिलेल्या परस्पर विरोधी फिर्यादी वरून तोफखाना पोलिस ठाण्यात १२ ते १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एका गटाच्या युवतीने दिलेल्या फिर्यादी वरून तैबुद्दिन, फरदीन, अरबाज, सोहेल यांच्या सह ३ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी युवती ही तिच्या शेजारणी बरोबर सार्वजनिक शौचालयाकडून घरी जात असताना या आरोपींनी तिला रस्त्यात अडवून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच या परिसरात राहायचे असेल तर नीट रहा नाहीतर तुम्हाला येथून हाकलून लावू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
तर दुसऱ्या गटाच्या महिलेने दिलेल्या फिर्यादी वरून सनी चखाले, त्याचा भाऊ विशाल चखाले, स्वप्नील ससाणे व अनोळखी ५ इसम (सर्व रा. रामवाडी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीचा मुलगा व सनी चखाले यांच्यात भांडण सुरु असताना ते मिटविण्यासाठी फिर्यादी व तिची नणंद या गेल्या असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
बजरंग दलाचे कुणाल भंडारीसह १५ ते २० जणांवरही गुन्हा दाखल
दरम्यान रामवाडी परिसरात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडल्या नंतर रात्री ११.५० च्या सुमारास बजरंग दलाचे शहर संयोजक कुणाल भंडारी याच्या सह १५ ते २० युवकांनी या परिसरात मोटारसायकल वर फिरत घोषणाबाजी केली. त्यामुळे सार्वजनिक शांतता भंग पावली. तसेच शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. या जमावाने जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचेही उल्लंघन केले असल्याची फिर्याद पो.हे.कॉ. तन्वीर शेख यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार कुणाल भंडारीसह १५ ते २० जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.