अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
तब्बल 291 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारांमुळे कोसळलेल्या नगर अर्बन को-ऑप. बँकेतील कथित घोटाळ्यांवर केंद्र सरकारच्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आता थेट चौकशी सुरू केली आहे. यानिमित्ताने बँकेचे माजी संचालक व बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गांधी हेच या प्रकरणातील मुख्य तक्रारदार असून त्यांच्या जबाबातून अनेक बड्या नावांचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गांधी यांच्या ईडी जबाबामुळे कोण कोण गोत्यात येणार या विषयी जिल्ह्यात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
दरम्यान, बुधवारी (16 जुलै) सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत गांधी यांच्याकडून ईडी अधिकार्यांनी सविस्तर माहिती घेतली. त्यांच्या जबाबाची नोंद अजून पूर्ण झालेली नाही, त्यामुळे त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. गांधी यांनी स्वतःही ही माहिती दिली असली तरी, चौकशीच्या गोपनीय स्वरूपामुळे अधिक खुलासा करण्यास त्यांनी नकार दिला. या ईडी चौकशीमुळे नगर अर्बन बँकेच्या वर्तुळात सध्या प्रचंड हालचाल सुरू असून, अनेक थकबाकीदार, माजी संचालक आणि हितसंबंधित व्यक्तींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गांधी यांनी दिलेल्या जबाबामुळे अनेक बड्या राजकीय नेत्यांसह व्यापारी व कर्ज थकवणार्यांची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बँकेच्या कारभारात झालेल्या कथित गैरव्यवहारामुळे शेकडो खातेदारांचे कोट्यवधी रूपये अडकून पडले आहेत. बँक प्रशासनाने ईडीकडे सादर केलेल्या माहितीनुसार, अनेक मोठे थकबाकीदार सततच्या मागणीनंतरही कर्जाची परतफेड करत नाहीत. त्यामुळे आता ईडी या थकबाकीदारांच्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामध्ये राजकीय व आर्थिक क्षेत्रातील काही प्रभावशाली नावांचा समावेश असल्याची चर्चा आहे. राजेंद्र गांधी यांनी या प्रकरणी पोलिसांत पूर्वीच फिर्याद दिली असून, त्यांच्या फिर्यादीच्या अनुषंगाने आता ईडीने त्यांच्याकडील दस्तऐवजांची तपासणी सुरू केली आहे. या चौकशीदरम्यान त्यांनी सादर केलेली कागदपत्रे आणि मांडलेली निरीक्षणे आता तपासाचा मुख्य आधार ठरणार आहेत.
हे ही गांधी आणि ते गांधी…!
नोटा (चलन) यांचा गांधी यांचा जवळचा संबंध आहे. गांधी शिवाय कोणतीच नोटाला (चलन) अर्थ नाही. नगर अर्बन प्रकरणात देखील गांधी यांनाच महत्व आलेले आहे. तक्रारे असणारे राजेंद्र गाधी असून बँकेच्या कार्यकाळाविषयी तक्रार, बँकेचे नुकसान झालेले त्यांचे नावही गांधीच आहे. शिवाय नोटावर (चलनावर) ही गांधी असल्याने अर्बन बँक घोटाळ्यात गांधी नावाला महत्व आले आहे.